मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते वडखळ 11 ‘ब्लॅक स्पॉट’, गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट खडतर

>>प्रणय पाटील

मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक बनला असून पळस्पे ते वडखळ दरम्यान 11 जीवघेणे ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याचे समोर आले आहे. त्यातच अनेक ठिकाणी टाकलेल्या ‘डायव्हर्शन’मुळे रस्ते चिंचोळे झाले असून पळस्पेपासून वडखळपर्यंत अवघ्या 34 किलोमीटर अंतरात तब्बल 1 हजार 252 खड्डे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेफिकीर कारभाराचा फटका यंदाही गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसणार असून त्यांना गचके खातच कोकण गाठावे लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे रडगाणे गेली 15 वर्षे सुरू आहे. या महामार्गाचे नष्टचर्य संपत नसल्याने याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. पनवेल हे कोकणाचे प्रवेशद्वार. परंतु तेथूनच चाकरमान्यांना पुढचा प्रवास किती जीवघेणा असेल याची जाणीव होऊ लागते. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते वडखळ या 34 किलोमीटर अंतरादरम्यान दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टनची वाहतूक होते. परंतु जागोजागी पडलेल्या मोठय़ा व्यासांच्या खोल खड्डय़ांमुळे वाहनचालकांना 30 ते 35 किलोमीटर ताशी इतक्या धीम्या वेगाने गाड्या चालवाव्या लागतात. त्यामुळे हे 34 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल सवा तासांहून अधिक काळ प्रवाशांना लागत आहे. त्यातच या खड्डय़ांमुळे अनेक गाड्या पंक्चर होऊन रस्त्याच्या मधोमध उभ्या असल्याचे चित्र रोजच दिसत आहे.

पनवेल ते वडखळ या मार्गावर खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरळखोप, रामवाडी, उघडे, वाशी फाटा, डोली, गडब, कासू, आमटेम आणि पेण फाटा ते अंगार आळी ही ठिकाणी अपघाताची ‘ब्लॅक स्पॉट’ ठरली आहेत. जास्तीत जास्त अपघात याच मार्गावर होत असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

ठेकेदाराच्या चालबाजीमुळे चाकरमान्यांच्या जिवाशी खेळ

खड्डे भरण्यासाठी ठेकेदाराने माती मिश्रीत खडी वापरली. ही खडी वाहनांच्या चाकाला चिकटून खड्डय़ाबाहेर आल्याने काही दिवसातच हे खड्डे उघडे पडले. या खड्डय़ातील चाकाला चिकटून आलेली खडी आणि माती रस्त्यावर पसरली. त्यामुळे वेळेत ब्रेक न लागल्याने गाडय़ांच्या एकापाठोपाठ एक धडका झाल्याच्या घटना वारंवार घडत असून चाकरमान्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.