साहित्य जगत – जयवंत दळवींची जन्मशताब्दी

>>रविप्रकाश कुलकर्णी

जन्माला आलेल्या प्रत्येकाची जन्मशताब्दी येतेच. पण म्हणून काय प्रत्येकाची जन्मशताब्दी साजरी होतेच असं नाही. आपल्याकडे वर्षश्राद्ध ही कल्पना आपल्या बापजाद्याचं स्मरण वर्षातून निदान एकदा तरी करावं या हेतूने धर्मशास्त्राने केली असावी. लोक त्याचा पण कंटाळा करायला लागल्याने धर्मवेत्त्यांनी सर्वपित्री अमावस्येची कल्पना पुढे आणली. जेणेकरून एकाच विधीत घाऊकपणे सगळ्या पितरांना तर्पण करता येऊ लागले. उगाच हा राहिला तो राहिला ही भानगड नको. शास्त्रातूनही मार्ग काढले जातात ते असे. त्यात कितीतरी जन्मशताद्या होऊन गेल्या असणार. जरा आठवलं तर काही नावं नक्की समोर येतील. शेवटी जन्मशताब्दीचीही कुणीतरी आठवण करून द्यायला लागतं का? शिवाय त्यातून घोळ निर्माण होतात किंवा होतील ही पुढची गोष्ट झाली. हे सगळं सांगायचं पण तसंच कारण आहे? जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी यांच्याकडून निमंत्रण आलं.

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्ष. 14 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2024. सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचे 14 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2024 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आयोजित केला आहे. हे पाहून सर्वप्रथम मनात आलं जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झाल्याची आठवण कुणालाच झाली नाही का? अर्थात जन्मशताब्दी सांगतेची का होईना आठवण निदान दळवींच्या मुलाला राहिली.

इथे काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय जयवंत दळवी यांच्याबाबत झालेल्या नोंदीत आणि संदर्भ ग्रंथात त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 असा आहे. अर्थात मोठय़ा माणसांच्या जन्म तारखांचा घोळ आपल्याकडे तसा नवीन नाही. त्याबाबत हिरिरीने वाद घालताना प्रसंगी भांडताना आपण पाहिलेलं आहे. सुदैवाने तशी वेळ जयवंत दळवी यांच्याबाबतीत तरी येणार नाही असं आपण समजूया… आणि हो, जयवंत दळवी एक की दोन असाही प्रश्न कोणी विचारणार नाही. मात्र मनात येतं, खुद्द दळवी यांनी ठणठणपाळी नजरेने किंवा अलाणे फलाणे स्टाइलने या प्रकरणाकडे कसं बघितलं असतं?

जयवंत दळवी हयात असताना त्यांचा मृत्यू झाला अशी अफवा ऑगस्ट 1987मध्ये उठली होती. त्याला धरून कुणा कुणाची कशी प्रतिािढया झाली. कोण कसं वागलं यात थोडा कल्पनेचा मालमसाला घालून सगळ्यांची कशी फजिती झाली याचं बहारदार वर्णन करणारा लेख त्यांनी अर्थात दिवाळी अंकासाठी लिहिला त्याचं शीर्षक होतं `आपुलें मरण पाहिले म्यां डोळां!’ त्या स्टाइलने, पाहिला तो अनुपम जन्मशताब्दी सोहळा दोनदा अशी कल्पना करून पाहायला हरकत नाही.

शेवटी जयंती काय वा पुण्यतिथी काय साजऱया का आणि कशा करायच्या? तर त्या व्यक्तीचे, घटनेचे, कार्याचे स्मरण राहावे म्हणून! बाकी जयवंत दळवी या लेखकाबद्दल आणि माणूस म्हणूनदेखील अमाप कुतूहल वाटावं अशा अनेक गोष्टी माहीत आहेत. शिवाय माहीत नसलेल्या गोष्टीही असण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा भिडस्त स्वभाव. पण त्यामुळेच त्यांची `उदार’ अशी प्रतिमा जनमानसात कायमची राहिली. लेखिका मंगला आठलेकर यांनी एक आठवण सांगितली आहे की, त्यांनी एकदा `कुंपणापलीकडचं शेत’ या पुस्तकाचं परीक्षण केलं. या पुस्तकाला जयवंत दळवींची प्रस्तावना होती. पण त्यात काही दम नव्हता. बाईंनी पुस्तकाबद्दल आणि प्रस्तावनेबद्दल फारसं चांगलं काही म्हटलं नाही. तेव्हा संपादक खात्याकडून निरोप आला की जयवंत दळवींबद्दल जरा सौम्यपणे टीका करून द्या. जयवंत दळवी यांच्या भलेपणाला मिळालेली ही दाद आहे.

जयवंत दळवी यांच्याबाबत म्हणायचं झालं तर त्यांची आठवण वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच येते. त्यात पुन्हा ठणठणपाळची. त्यातही नेहमीचाच विचार सांगून म्हणायचं तर, जोवर आहे स्मरण, त्याला कसलं आलं मरण?’ जयवंत दळवींच्या बाबतीत तर हे एकशे एक टक्के खरं आहे. जयवंत दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांनी त्यांच्या हिशेबाप्रमाणे आपल्या वडिलांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने एक सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने दळवींचे आप्त, सुहृदय आणि अर्थातच त्यांचे चाहते एकत्र भेटणार आहेत. पुन्हा एकदा जयवंत दळवींच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. जयवंत दळवींच्या आठवणी आठवण्यासाठी कोणतेही निमित्त पुरते!

राहता राहिली तुमच्या-आमच्यासारख्या दळवींच्या चाहत्यांची गोष्ट. त्यांच्या लेखी 14 ऑगस्ट 1925 हा जयवंत दळवींचा जन्मदिन आहे. जो जगमान्य आहे. आपण ही गोष्ट जरूर लक्षात ठेवून त्यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात करूया. चांगल्या गोष्टीची पुनरावृत्ती झाली तर कुठे बिघडतं?
जयवंत दळवींचं असंही वेगळेपण आहे तर…