वेबसीरिज – विचारांना चालना देणारी कालकूट

>>तरंग वैद्य

‘अॅसिड अटॅक’ या विषयावर बेतलेली ही वेब सीरिज देशाच्या भ्रष्ट तंत्रावर भाष्य करते. ‘अॅसिड अटॅक’सारख्या अतिशय संवेदनशील तितक्याच गांभीर्याने हाताळलेल्या या विषयाबाबत जागरुकता निर्माण करणारी ही वेब सीरिज आहे. कालकूट, हिंदू पुराणानुसार विष आहे जे समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी मिळून काढले होते. असे विष ज्याचा उपयोग जर ठरवले तर चांगल्यासाठी पण होऊ शकतो. देशाच्या भ्रष्ट तंत्रावर हा विषप्रयोग असे कथानक असणारी वेब सीरिज 2023 मध्ये जियो सिनेमावर रुजू झाली. नाव अर्थातच ‘कालकूट.’ अॅसिड अटॅक या विषयावर बेतलेली ही वेब सीरिज एकूण आठ भागांची असून सात भाग 35 मिनिटांचे आहेत, तर शेवटचा भाग पन्नास मिनिटांचा.

तीन महिन्यांपूर्वीच नोकरीत लागलेल्या सबइन्स्पेक्टर रविशंकर त्रिपाठीचे मन नोकरीत अजिबात लागत नाही. त्याला विभागाची कार्यपद्धती पटत नाही आणि तो एवढी चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. मात्र त्याचा राजीनामा स्वीकारला जात नाही आणि त्यावर पारुल या मुलीवर झालेल्या अॅसिड अटॅकची केस सोपवली जाते. नाईलाजाने रवी चौकशी, तपास सुरू करतो. असल्या केसेसचा ‘सक्सेस रेशिओ’ खूपच कमी असल्यामुळे त्याचे वरिष्ठ याबाबतीत विशेष लक्ष घालत नाहीत आणि नोकरीतच रस नसल्यामुळे रवीसुद्धा दाखवायचे म्हणून कामास सुरुवात करतो, पण काम म्हटले की तपास, चौकशी, संबंधितांशी भेटीगाठी हे सगळे आलेच. चौकशीदरम्यान रवीला पीडितेला, तिच्या परिवाराला भेटावे लागते आणि मग त्याच्या लक्षात येते की, हा गुन्हा किती घृणास्पद आणि क्रूर आहे. इथे त्याचे मन आणि मतपरिवर्तन होते आणि आणि तो ठरवतो की, असल्या मनोविकारी गुन्हेगाराला पकडून इतर मुलींचे आयुष्य तर वाचवायचेच, पण गुन्हेगाराला जबर शिक्षा देऊन असले हिडीस कृत्य कोणी करणार नाही अशी भीतीही निर्माण करायची.

रवी आता संपूर्णपणे या केसच्या मागे लागतो आणि दिसणारी घटना साधी नसून याच्या मागे भरपूर काही आहे हे त्याच्या लक्षात येते. इथे भ्रष्ट व्यवस्थेशी त्याला लढावे लागते, प्रसंगी नियमाविरुद्ध जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात. आपल्याच विभागातील लोकांची नाराजी झेलावी लागते, पण तो डगमगत नाही आणि सक्सेस रेशिओच्या विरुद्ध जात यश मिळवतो.
विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो तितक्याच गांभीर्याने हाताळला आहे. आपण असल्या प्रकारांबद्दल ऐकतो, वाचतो आणि सोडून देतो. ही वेब सीरिज बघितल्यावर नक्कीच आपला दृष्टिकोन बदलेल. ऐकताना साधा वाटणारा हा गुन्हा किती क्रूर आहे याची कल्पना येते, हवालदिल व्हायला होते आणि एक चीड निर्माण होते. आपण गप्प बसायचे नाही असा विचार मनात येतो आणि इथेच वेब सीरिज जिंकते. भ्रष्ट व्यवस्था, आडकाठय़ा हे जागरूकतेपुढे क्षुल्लक मुद्दे ठरतात.

श्वेता त्रिपाठी, सीमा बिस्वास, यशपाल शर्मासारख्या अभिनयसंपन्न कलाकारांचे या मालिकेच्या यशात मोठे योगदान आहे. सतत “लग्न कर, लग्न कर” अशी मुलाच्या मागे लागणारी आई सीमा बिस्वास अनेकांना जवळची वाटेल. विजय वर्मा… अमिताभ बच्चन यांचे अनेक सिनेमात हेच नाव होते. सबइन्स्पेक्टर रवीच्या भूमिकेतील नटाचे खरे नाव विजय वर्मा आहे आणि त्यांनी बच्चनसाहेबांच्या तोडीचा अभिनय केला आहे. तसे विजय वर्मा नाव हे आता चांगल्या परिचयाचे झाले आहे. ‘दहाड’सारख्या गाजलेल्या आणि इतर काही मालिकांमध्ये आपण त्याला बघितले आहे, पण नकारात्मक भूमिकेत. इथे तो नायकाच्या सकारात्मक भूमिकेत आहे.

नाईलाजाची नोकरी, नंतर आलेले आपल्या जबाबदारीचे भान, आईच्या कटकटींपासून त्रस्त, वरिष्ठांशी हुज्जत असे विविध पैलू त्याने नीट सांभाळले आहेत. मुख्य म्हणजे जेव्हा त्याला अॅसिड अटॅकचे गांभीर्य समजते तेव्हा त्याच्या मनाची चलबिचल त्याच्या चेहऱयावरही तेवढय़ाच स्पष्टतेने झळकते.

वेब सीरिजचे पहिले पाच भाग खिळवून ठेवतात.विचार करायला भाग पाडतात. थोडक्यात, प्रेक्षक कथेशी एकरूप होऊन जातात. गुन्हेगार कोण? ही आतुरता शेवटपर्यंत ठेवत कथेतील रंजकता कायम ठेवली आहे. तांत्रिक बाबी पण नीट सांभाळल्या आहेत. फक्त सातव्या आणि आठव्या भागात लेखक किंचित भरकटला आहे. मूळ विषय सोडून देशभक्ती, महिला अन्याय यांसारख्या मुद्दय़ांवर त्यांनी प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे, जो या वेब सीरिजमध्ये अजिबात गरजेचा वाटला नाही. एवढय़ा संवेदनशील मुद्दय़ासमोर हे मुद्दे क्षुल्लक असल्यामुळे ‘कालकूट’ ही विचारांना चालना देणारी मालिका नक्कीच बघा.

[email protected] (लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)