डॉ. श्री व सौ कोल्हे, कुमार केतकर व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना कृतज्ञता पुरस्कार जाहीर

50

सामना प्रतिनिधी । नगर

यशवंत सामाजिक प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी देण्यात येणारे कृतज्ञता पुरस्कार, डॉक्टर रवींद्र व स्मिता कोल्हे , जेष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाल्याची माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी दिली आहे.

सोनई तालुका नेवासा येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रविवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख असणार आहेत. यापूर्वीचे पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, साहित्यिक ना. ध. महानोर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, नसीमा हुरजूक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, डॉ तात्याराव लहाने, सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, सदानंद मोरे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे हे सामाजिक कार्यकर्ते असून मेळघाटमधील आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य यासह अनेक सामाजिक कामात त्यांचे मोठे योगदान आहे. कुमार केतकर यांनी अनेक वर्तमानपत्राची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळली असून सर्व नामवंत वर्तमानपत्रात संपादक म्हणून त्यांनी काम बघितले आहे. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत व राज्यसभेवर खासदार असून अभ्यासू व प्रभावी वक्ते आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, तेलगु, तामिळी, कन्नड, मल्याळम या चित्रपटात काम केले आहे. महाराष्ट्र राज्यात वृक्ष लागवडीसाठी मोठे कार्य त्यांच्या हातून होत आहे. यशाच्या शिखरावर असतांनाही ग्रामीण संस्कृतीशी असणारी आपली नाळ त्यांनी आजही जोडून ठेवली आहे.

या कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शंकरराव गडाख यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या