>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेननेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय देशमुख विजयाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे देशमुख समर्थक उत्साहात जल्लोष करत आहेत. यवतमाळ येथील शासकीय गोडाऊन परिसरात मतमोजणी करण्यात येत आहे. मतमोजणीच्या आदल्या दिवशीच देशमुख समर्थकांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत तसे बॅनर लावले होते. आता देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून त्यांच्या समर्थकांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर देशमुख समर्थक मोठ्या प्रमाणात जमले आहेत. देशमुख यांच्या बाजूने निकाल येण्यास सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बाविसाव्व्या फेरीनंतर देशमुख यांनी 69 हजार 948 मतांची आघाडी घेतली. या आघाडीमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या विरोधात येथे प्रचंड संताप होता. त्यामुळे शिंदे गटांने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, तरीही जनतेत भाजप आणि गद्दारांबाबत रोष होता. तो मतदानातून दिसून आला आहे. देशमुख यांनी मोठी आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अद्याप 8 फेरींची मतमोजणी शिल्लक आहे.
संजय देशमुख यांच्या विजयाचा जल्लोष मतमोजणीआधीच दिसून आला. पुसद शहरामध्ये निकालापूर्वीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार संजय देशमुख हेच निवडून येतील असे बॅनर पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झळकले होते. तसेच पुसद शहराच्या अनेक भागात हे पोस्टर झळकले आहेत . या बॅनरवर “ विजय निश्चित ” अरे कोण म्हणते येत नाही आल्याशिवाय राहत नाही, असे असून त्याखाली महाविकास आघाडी…. असे होते. नगरपालिका माजी सभापती राजू दुधे व माजी मंत्री संजय देशमुख यांचा शुभेच्छा देताना फोटो आहे. येथील पराभव निश्चित असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता आहे.