
महायुती सरकारच्या राज्यात राज्यातील कंत्राटदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण होऊनही शासनाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदार खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. मात्र ते चुकवायला पैसे नसल्याने कंत्राटदारावर चोरी करण्याची वेळ आली, हे यवतमाळमधील एका गुन्ह्याच्या तपासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
यवतमाळ जिह्यातील आर्णी मार्गावरील नऊ लाखांच्या चोरीचा तपास करताना अवधूतवाडी पोलिसांनी तळेगाव-भारीचे उपसरपंच दिनेश मंडाले यांना ताब्यात घेतले. उपसरपंच दिनेश मंडाले हे शासकीय कंत्राटदार असून खिशात पैसे नसल्याने आणि उधारी थकल्याने मानसिक दडपणातून त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम केले, पण व्यवस्थेने त्याला गुन्हेगार बनवले, अशीच काहीशी भावना यवतमाळच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटत आहे.
नेमके काय घडले?
साबीर हुसेन भारमल यांनी गुरुवारी सकाळी बँकेत भरण्यासाठी घरून नऊ लाखांची रोख आणली. पैशांची ही बॅग त्यांनी काऊंटरवर ठेवली. यावेळी गिऱहाईक बनून आलेल्या व्यक्तीने काही साहित्य मागितले. ते साहित्य देण्यासाठी साबीर यांची पाठ फिरताच त्या व्यक्तीने ती बॅग लंपास केली. सीसीटीव्हीमध्ये चेहरा झाकलेला होता. ठाणेदार नंदकिशोर काळे आणि सहाय्यक निरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपीचा माग काढला. एका लोकप्रतिनिधीला पुराव्याशिवाय हात लावणे कठीण होते, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उपसरपंच दिनेश मंडाले याला बेडय़ा ठोकल्या. शासकीय कंत्राटाचे कामे करूनही पैसे मिळत नसल्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.





























































