यवतमाळच्या भाजी विक्रेत्याचे जेईई अॅडव्हान्स परिक्षेत यश, आई वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

>> प्रसाद नायगावकर

असं म्हणतात की, माणूस दृढनिश्चयी असेल तर तो काहीही करू शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली तरी तो आपली यशोगाथा घडवतो. गरिबी माणसाचं धैर्य तोडू शकत नाही. ज्यांची ध्येयं मजबूत असतात ते कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचा मार्ग शोधतात. असेच काही यवतमाळमधील एका विद्यार्थ्यांने आज आम्ही तुम्हाला अशाच एका भाजी विक्रेत्याच्या मुलाची ही यशोगाथा आहे.

देशात अत्यंत कठीण समजली जाणारी तसेच आयआयटी करीता आवश्यक असलेली जेईई अॅडव्हान्स परीक्षा यवतमाळच्या एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने पास केली आहे आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे . रुद्राक्ष गायकवाड असे त्याचे नाव असून त्याचे वडील संतोष हे यवतमाळ शहरात भाजीचा व्यवसाय करतात. अत्यंत सर्वसाधारण जीवन जगणा-या गायकवाड परीवाराचे आता या यशामुळे कौतुक केले जात आहे.

संतोष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळात भाजीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीची परीस्थिती असल्यामुळे संतोष यांना लहान वयात हॉटेलमध्ये काम करावे लागले. अत्यंत संघर्षमय जीवन जगत असल्यामुळे इच्छा असतांनाही त्यांना चांगले शिक्षण घेता आले नाही. ते चौथी पास आहेत. विशेष म्हणजे गायकवाड यांच्या घराण्यात इयत्ता 10 वी सुद्धा कोणी पास नाही. मात्र संतोष यांनी भाजीचा व्यवसाय करीत पोटाला चिमटा घेत आपली मुले घडवली. त्यांची मोठी मुलगी नागपूर येथे शासकीय दंत चिकित्सामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तर रुद्राक्ष मिळालेल्या संधीचे सोने करीत जेईई अॅडव्हान्स यशस्वीरीत्या पार केली आहे. रुद्राक्ष आपल्या यशाचे श्रेय वडील संतोष, आई छाया तसेच त्याची बहीण डॉ. धनश्री , काका सतीश यांना देतो.