YES Bank चे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ED चे छापे

1105

YES Bank crisis येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर शुक्रवारी रात्री अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ED ने छापेमारी केली. निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी आश्वासन दिलं होतं की पुढच्या 30 दिवसांत येस बँकेचे  (YES Bank) पुनर्गठन केले जाईल. या आश्वासनाच्या काही तासांतच राणा कपूर यांच्या घरावर हे छापे पडले आहेत. संचलनालयाने राणा कपूर यांच्याविरूद्ध खटलाही दाखल केला आहे.

छाप्यांदरम्यान राणा कपूर यांच्या घरातून बँकेशी निगडीत काही कागदपत्रे तपासण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून या छाप्यांबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. राणा कपूर यांच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली असून तपास पूर्ण होईपर्यंत कपूर यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गुरुवारी रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना खात्यातून रक्कम काढण्यावर मर्यादा घातली होती. खातेधारक फक्त 50 हजार रुपयेच काढू शकतात असे रिझर्व्ह बँकेने सांगितले होते.

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर (YES Bank) निर्बंध घातल्याचं कळाल्यानंतर माध्यमांनी राणा कपूर यांच्याशी संपर्क साधला होता. माध्यमांशी बोलताना कपूर यांनी आपण या बँकेशी आता निगडीत नसल्याचं सांगितलं होतं. गेली 13 वर्ष आपण सक्रीय नसून या संकटाबाबत मी काहीही करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं. येस बँकेने नोव्हेंबर 2019 मध्ये शेअर बाजाराला सूचित केले होते की राणा कपूर हे संचालक मंडळातून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत.

या बँकेमध्ये राणा कपूर यांचा हिस्सा 11.88 टक्के इतका होता. जुलै 2019 मध्ये हा हिस्सा 3.92 टक्के इतका झाला असल्याचं कळालं होतं. कपूर यांनी येस कॅपिटल आणि मॉर्गन क्रेडीटमधलीही आपली भागीदारी कमी केली होती. त्यांनी ही भागीदारी 6.29 टक्क्यांवरून 0.80 टक्के इतकी केली होती. याशिवाय निप्पॉन इंडिया एएमसीमध्ये राणा कपूर यांनी हे समभाग तारण म्हणून ठेवले होते त्या समभागांचा लिलाव करण्यात आला होता.

राणा कपूर यांच्यावर बेफाम कर्ज वाटल्याचा आरोप आहे. ओळखीपाळखीतील लोकांच्या कंपन्यांना त्यांची पत न पाहता कर्ज देण्यात आल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. ज्या कंपन्यांना या बँकेने कर्ज दिली होती त्यामध्ये दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानी समूहाचाही समावेश आहे. याशिवाय IL&FS, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, एस्सेल ग्रुप, रेजियस डेव्हलपर्स आणि मंत्री समूहालाही या बँकेने कर्ज दिली. या सगळ्यांनी कर्ज थकवल्याने बँकेची आर्थिक अवस्था डबघाईला आली आहे. या बड्या उद्योगपतींना कर्ज मिळावी यासाठी राणा कपूर यांनी ‘खास’ प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. 2018 साली कपूर यांच्यावर कर्ज आणि ताळेबंदातील अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे रिझर्व्ह बँकेने त्यांना अध्यक्षपदावरून सक्तीने दूर केलं होतं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की बँकेच्या या स्थितीला वैयक्तिकरित्या कोण जबाबदार आहे याचा शोध घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले असून खातेधारकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले आहेत. 2017 पासून या बँकेवर लक्ष ठेवलं जात होतं असं सीतारमण यांनी सांगितले. बँकेवरील निर्बंधांमुले तिथे काम करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. या कर्मचाऱ्यांना सीतारमण यांनी दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्यांची नोकरी शाबूत राहील आणि त्यांना पुढचे एक वर्ष पगारासाठी काही अडचण येणार नाही असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहे. या बँकेत गुंतवणूक करण्यास स्टेट बँक ऑफ इंडिया उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या