
भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभांमधून दोन्हीकडील नेत्यांकडून एकमेकांवर टीका करताना आव्हानाची भाषा वापरली जात आहे. सांगलीमधील प्रचारसभेत शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांची दादागिरी जाहीरपणे दिसून आली. ‘माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री आहे,’ असे म्हणत त्यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले.
सांगलीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात राजकीय वॉर सुरू आहे. सुहास बाबर हे सांगलीच्या खानापूरमधील आटपाडी मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार आहेत. तेथील करंजे जिल्हा परिषदेतील पळशी गावात आयोजित प्रचारसभेत स्थानिक भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना बाबर यांचा जिभेवर ताबा राहिला नाही. ‘तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार, सुहास बाबर कोण आहे? त्याचे उत्तर मुख्यमंत्रीच देतील,’ अशी दादागिरीची भाषा त्यांनी वापरली.


























































