
रस्त्याच्या कामाला सहकार्य करा असे मी बीडीओला, तहसीलदाराला, पीआयला सांगितले आहे. काकालाही म्हटले, विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावे लागते. त्याशिवाय पुढे काहीच चालत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र लगेच खुलासा करत काका म्हणजे काका कुतवळ, नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल, दादा ‘काकां’वर घसरले. मी काही कोणावर घसरलो नाही, अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडली.
बारामतीतील सुपे येथे बोरकरवाडी तलावात
पाईपलाईनद्वारे जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले. या वेळी पाणी पूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते. बोरकरवाडी येथील सुमारे 1300 मीटर पाईपलाईन टीसीएस फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून सुमारे 2 कोटी 90 लाख खर्चाचे काम करण्यात आले आहे. जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या उजवा कालवा ते बोरकरवाडी तलावापर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र त्यातील राहिलेले 200 मीटरचे काम निधी मिळताच लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. लाडक्या बहिणीकडे लक्ष दिले. त्या वेळी आमच्यावर टीका झाली. निवडणूक झाली की योजना बंद करतील. पण तसे आम्ही केले नाही. योजना सुरू ठेवली. मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुरंदर विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही
पुरंदर विमानतळाचे काम हातात घेतले आहे. लोक विरोध करत आहेत. पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सरकार म्हणून बसलो आहोत. मी गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. कामे हवेत होणार नाहीत. त्यासाठी जागा लागेल. जातीय सलोखा असला पाहिजे. कुठे काहीतरी झाले म्हणून मारहाण करायची हे चालणार नाही. आपण हिंदुस्थानात आहोत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने राहिले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.