
साडेतीन वर्षे शहरप्रमुखपद भोगलेत. आता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपच्या वळचणीला गेला आहात. विनाकारण शिवसेनेवर खोटेनाटे आरोप करू नका, तुमच्यासोबत कोणीही निष्ठावंत शिवसैनिक गेलेला नाही. त्यामुळे शायनिंग मारायला खोट्या याद्या देऊ नका, असे खडे बोल शिवसैनिकांनी भाजपवासी झालेल्या प्रकाश तेलगोटे यांना सुनावले. पक्षसंघटना आम्ही आणखी मजबूत करू आणि कल्याण, डोंबिवलीतील सत्तेवर निष्ठेची मशाल पेटवू असा निर्धारच शिवसैनिकांनी यावेळी केला.
डोंबिवली पश्चिमेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख अक्षय म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाची आढावा बैठक झाली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना सोडून भाजपच्या वळचणीला गेलेले प्रकाश तेलगोटे यांनी गेल्या पाच वर्षांत पक्षात त्रास झाल्याचा खोटा आरोप केला. त्याचा समाचार शिवसैनिकांनी घेतला. तेल गोटे तुम्ही शहरप्रमुखपदावर होतात.. पक्ष आणि कामकाज चालवण्याचे सर्वाधिकार तुमच्याकडे होते. मग तुम्हाला नेमका कोणता त्रास झाला याचा खुलासा करा, असे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर यांनी ठणकावले.
तेलगोटे पक्ष सोडून गेले असले तरी त्यांच्यामागे कोणताही निष्ठावान शिवसैनिक गेलेला नाही. त्यामुळे त्यांनी पक्षावर खोटेनाटे आरोप करू नये, असा इशाराही भोईर यांनी दिला. ज्या पक्षाने तुम्हाला साडेतीन वर्षे संधी दिली तो सोडल्यानंतर वाट्टेल ते आरोप करू नका, असा इशारा उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनी दिला.
७५ निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांच्या नावाची बोगस यादी
तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश करताना शिवसेनेच्या ७५ निष्ठावान महिला कार्यकर्त्यांची बोगस यादी दिली. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि इथेच राहू.. तुम्हाला आमची नावे वापरण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल महिला आघाडी संघटक लक्ष्मी कांबळी यांनी केला. यापुढे पक्ष किंवा कार्यकर्त्यांवर खोटे आरोप केलेत तर महिला आघाडी गप्प बसणार नाही. शिवसेना स्टाईने उत्तर देऊ, असा इशाराच यावेळी कांबळी यांनी दिला.





























































