वर्षाला चार कोटी भरण्यापेक्षा देश सोडलेला बरा, भरमसाट टॅक्सला तरुण उद्योजक कंटाळला

केंद्रातील मोदी सरकारने भरमसाट टॅक्स आकारला आहे. सरकारने टॅक्समधून कोटय़वधी रुपये मिळवण्यासाठी अवाच्या सवा टॅक्स आकारला आहे. याचा फटका जसा मध्यमवर्गींयांना बसत आहे, तसाच फटका तरुण उद्योजकांनाही बसत आहे. बंगळुरूमधील एक तरुण उद्योजक याच टॅक्सला कंटाळला असून तो नव्या वर्षात हिंदुस्थान सोडून दुसऱया देशात उद्योग उभारणार असल्याचे त्याने ध्येय ठेवले आहे. रोहित श्रॉफ असे या तरुण उद्योजकाचे नाव असून तो एफ्लॉग ग्रुपचा संस्थापक आहे. मागील 12 ते 18 महिन्यांत तब्बल चार कोटी रुपयांचा टॅक्स भरल्याचेही रोहित श्रॉफने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रोहितने लिंक्डइनवर एक पोस्ट केली असून यात म्हटले की, मी मागील 12 ते 18 महिन्यांत जवळपास चार लाख कोटी रुपयांचा जीएसटी व आयकर भरला आहे. एवढा मोठा टॅक्स भरल्यानंतरही माझ्याकडे संशयास्पद दृष्टीने पाहिले जाते. जे व्यवसाय, उद्योग प्रामाणिकपणे कर भरतात त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. देशात फक्त पाच टक्के लोक कर भरतात. या लोकांनाच नेहमी लक्ष्य केले जाते. कर जमा करणाऱया संस्थांकडून वारंवार नोटिसा पाठवल्या जातात. पडताळणी केली जाते. स्थानिक जीएसटी अधिकारी आणि राष्ट्रीय पातळीवरील आयकरशी संबंधित टीम वारंवार कर भरण्यासाठी आग्रही असतात. व्यावसायिकांना दर महिन्याचा जीएसटी, टीडीएस आणि वार्षिक आयकर भरण्यासाठी सतत टीम नेमावी लागते. एवढे सर्व करूनही व्यवस्थेकडून व्यवसायांना कोणताही लाभ मिळत नाही. जर एवढे सगळे करूनही व्यावसायिकांना लाभ मिळत नसेल तर हे सगळे करून काय साध्य होणार आहे, असा संतप्त सवाल रोहित यांनी केला आहे.

हिंदुस्थानातून बाहेर पडणे हेच ध्येय

हिंदुस्थानात कर भरणाऱयांचा विचार केला जात नाही. सरकारकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्यावर टॅक्सचे जास्तीत जास्त ओझे टाकले जात आहे. हे त्यांना सोपे वाटत आहे. त्यामुळे देशातील भरमसाट टॅक्सला कंटाळून नव्या वर्षात दुसऱया देशात व्यवसाय करण्याचे ध्येय ठेवले आहे. 2026 साठी ठेवलेले ध्येय खूप सोपे आहे. देशातून बाहेर पडणे आणि तिकडे जाऊन व्यवसाय उभा करणे गरजेचे आहे. व्यवस्थेमध्ये दोष असल्याने हे पाऊल उचलावे लागते याचे दुःख होत आहे, परंतु हे करावेच लागेल, असेही रोहित श्रॉफ यांनी म्हटले आहे.