टेरेसच्या कठड्यावर बसून फोनवर बोलत होती तरुणी, अचानक तोल गेला अन् होत्याचं नव्हतं झालं!

टेरेसच्या कठड्यावर बसून पाय लटकवत फोनवर बोलणे तरुणीच्या जीवावर बेतले आहे. फोनवर बोलत असताना तोल जाऊन तरुणी खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. नागपूरमधील प्रताप नगर पोलीस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना घडली. मानसी अबेदवार असे 18 वर्षीय तरुणीचे नाव आहे. मानसीने नुकतीच बारावी पास केली होती.

‘मिड डे’ने दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी गोपाळ नगर परिसरात कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहत होती. बुधवारी दुपारी 2 वाजता तरुणी घराच्या टेरेसच्या कठड्यावर पाय हवेत लटकवत फोनवर बोलत बसली होती. यावेळी तिचा तोल गेला आणि ती खाली जमिनीवर कोसळली.

तरुणीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आई आणि भाऊ धावत बाहेर आले. बाहेर येऊन पाहिले तर मानसी जखमी अवस्थेत जमिनीवर पडली होती. शेजारी आणि कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्ररकणी प्रताप नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.