
बिहारमधील सर्पमित्र म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जय कुमार साहनी (33) याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्याने तब्बल 2,000 हून अधिक सापांना जीवनदान देण्याचे काम केले. निवासी भागात शिरलेल्या अत्यंत विषारी सापापासून सुटका करायची असेल तर परिसरातील मंडळी साहनीशी संपर्क साधत असे. मात्र हा सर्पमित्र सापाच्याच विषामुळे मृत्युमुखी पडला आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून सापांचे प्राण वाचवत होता. वाचवलेल्या सापांना तो जंगलात सोडायचा.
जय कुमार साहनीचे सापांना वाचवतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्याला जवळच्या गावातून विषारी साप पकडण्यासाठी फोन आला. मग त्याने तत्काळ घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. या वेळी सापाने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला आणि साहनीचा मृत्यू झाला.
प्रशिक्षणाशिवाय ‘सर्पमित्र’
जय साहनी याचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दोन लहान मुले आहेत. त्याचे वडील म्हणाले की, जयला लहानपणापासूनच प्राण्यांची प्रचंड आवड होती. त्याने सर्पमित्र म्हणून कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय काम सुरू केले होते. तो सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात तासन्तास घालवत असे, पण सर्पदंशानेच त्याचा जीव घेतला याचे वाईट वाटते.
सापांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि एखाद्याला चावल्यास काय करावे याबद्दल तो लोकांना जागरूक करत असे. साहनी सापाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असायचा, पण त्याच कुळातील एका विषारी सापाने चावा घेतला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जिह्यातील लोक त्याला प्रेमाने सर्पपुरुष आणि ‘सापांचा मसीहा’ म्हणत होते.