
नात्याला काळिमा फासल्याची घटना पूर्व उपनगरातील पार्क साईट परिसरात घडली. तरुणाने चक्क त्याच्या मावशीसोबत अनैतिक संबंध ठेवले. अनैतिक संबंधातून महिलेने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्माची माहिती लपवण्यासाठी तो ते बाळ त्याच्या मित्राकडे घेऊन जात होता. याप्रकरणी पार्क साईड पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सतीश ससाणे हे पार्क साईड पोलीस ठाण्यात बिट स्पेशल म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी ते गांधी नगर जंक्शन येथे उभे होते. तेव्हा एक जण मळकट कपडय़ामध्ये काही तरी घेऊन पवईच्या दिशेने जात होता. त्याला ससाणे यांनी हटकले. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ससाणे यांनी तो कपडा उघडला असता त्यात स्त्री जातीचे अर्भक दिसून आले. त्याबाबत त्याने एकाकडे चौकशी केली. त्याने ते अर्भक आपलेच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ससाणे यांनी त्याला पोलीस ठाण्याच्या निर्भया अधिकारी यांच्याकडे उभे केले. त्याने चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्याचे त्याच्या मावशीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. ती गर्भवती राहिली. शनिवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने त्याला घरी बोलावले. त्याने तिची घरीच प्रसूती केली. बाळाची माहिती कुटुंबीयांना समजेल या हेतूने तो त्या बाळाला त्याच्या मित्राकडे घेऊन जात होता. त्यानंतर पोलिसांनी त्या बाळाच्या आईचा शोध घेतला.