
पत्नीपासून लपवाछपवी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. थायलंड प्रवासाबाबत माहिती लपवल्याप्रकरणी साताऱ्याच्या एका तरुणाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. तुषार पवार असे अटक केलेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
पवार हा थायलंडला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तुषारने पासपोर्टमधील प्रवासाच्या नोंदींमध्ये छेडछाड केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर सहार एअरपोर्ट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तुषार पवार हा सातारा येथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. तुषार पदवीधर असून, त्याचा लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे. पवार हा त्याच्या ग्राहकासोबत थायलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पत्नीसोबतचे भांडण टाळण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचे तुषारने चौकशीत सांगितले. 2023 आणि 2024 मधील थायलंड ट्रिपबाबत आपल्या पत्नीला माहिती नव्हती. पत्नीला माहिती मिळाली असती तर दोघांमध्ये भांडण झाले असते. त्यामुळे आपण पासपोर्टमधील प्रवासाच्या नोंदींमध्ये छेडछाड केल्याची माहिती तुषारने दिली.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, तुषारने पासपोर्टमधील 12 पानांमध्ये छेडछाड केली आहे. सहार एअरपोर्ट पोलिसांनी तुषारला अटक केली आहे. फसवणूक आणि भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.