
19 वर्षांखालील आशियाई मुष्टियोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या पाच पुरुष मुष्टियोद्धय़ांनी आपल्या-आपल्या वजनी गटातील सामने जिंकत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यामुळे आता त्यांची पाच पदके पक्की झाली आहेत. शिवम (55 किलो), मौसम सुहाग (65 किलो), राहुल पुंडू (75 किलो), गौरव (85 किलो) आणि हेमंत सांगवान (90 किलो) यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.
यापूर्वी सात महिला मुष्टियोद्धय़ांनीही उपांत्य फेरी गाठून पदके निश्चित केली होती. सध्या 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील आशियाई मुष्टियोद्धा अजिंक्यपद स्पर्धा एकत्र आयोजित केल्या जात आहेत. 22 वर्षांखालील गटातही हिंदुस्थानची 13 पदके पक्की झाली आहेत.
शिवमने उझबेकिस्तानच्या अब्दुलअजीज अब्दुनाझरोववर 5-0 अशी मात केली, तर मौसमने किर्गिस्तानच्या मुखम्मद अलीमबेकोवला 3-2 ने पराभूत केले. राहुलने दक्षिण कोरियाच्या उंजो जियोंगविरुद्ध सामना निर्णायक क्षणी थांबवल्याने विजय मिळवला. गौरवने चिनी तैपेईच्या पुआंग याओ चेंगला हरवले, तर हेमंतने उझबेकिस्तानच्या मुहम्मदरिजो सिद्दिकोवचा पराभव केला. मात्र 90 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गटात पृषला इराणच्या अब्बास घरशासबीकडून पराभवाचा सामना करावा लागला.