नीटच्या निकालाविरोधात दिल्लीत हजारो तरुण रस्त्यावर; काँग्रेसची धडक… पाणी फवारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, अनेकांना अटक

नीट अर्थात वैद्यकीय प्रवेश प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटला नसल्याचे सांगत एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांनी सर्व आरोप फेटाळले. मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही नीट परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा रोष कायम आहे. दिल्लीत आज हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी लावून धरली. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच नीट परीक्षा दिलेल्या तरुणांनी एनटीएच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरुणांचा रुद्रावतार पाहून सरकारच्या सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः तारांबळ उडाली. पाण्याचा फवारा मारून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अनेकांना अटक करण्यात आली.

नीट परीक्षेच्या निकालात झालेला गोंधळ हा देशातील आरोग्य व्यवस्था आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत धोका असून आज देशात अशी कुठलीच परीक्षा शिल्लक राहीलेली नाही ज्यात गोंधळाचे वातावरण नाही, असा आरोप भारतीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी यांनी केला. सरकार पेपर लीक आणि परीक्षेच्या निकालातील गोंधळाबद्दल काहीच बोलत नाही. परीक्षा घेणारी संस्था एनटीएदेखील याबाबत अवाक्षर काढत नसल्याने ही संस्थाही संशयाच्या भोवऱयात सापडल्याचे श्रीनिवास म्हणाले.

नीटचा गोंधळ काय?

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभर वाद निर्माण झाला. 2023 मध्ये केवळ दोन विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले असताना यंदा त्यात भर पडून तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले असून पात्रता गुणांमध्ये प्रचंड वाढ झाली. यंदा अचानक गुणांमध्ये तफावत दिसून आल्याने  एनटीएच्या कारभारावर शंका उपस्थित होत आहे. .

लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

नीटचा निकाल अत्यंत घाईगडबडीत जाहीर करण्यात आला. त्यामुळे निकाल जाहीर करणाऱया एनटीएबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होतात. संस्थेने याप्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. कारण, पेपर लीक माफिया विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत, असे भारतीय युथ काँग्रेसने म्हटले आहे.

नागपूरमध्ये पालक-विद्यार्थी आक्रमक

नागपूरमध्ये फीट जी या शिकवणी वर्गाच्या विरोधात शेकडो पालक रस्त्यावर उतरले. जेईईच्या शिकवणीसाठी फीट जीच्या संचालकाने पालकांकडून लाखो रुपये घेतले. मात्र, चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नियमित शिकवणी दिली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला. याविरोधात लॉक कॉलेज चौकातील फीट जीच्या शिकवणी वर्गासमोर दुपारी शेकडो पालक आणि विद्यार्थी जमा झाले आणि शिकवणी वर्गाच्या विरोधात घोषणा दिल्या. अनेक चांगले शिक्षक सोडून गेले. मात्र, नवीन शिक्षकांना नेमण्यात आले नाही. याबाबत वारंवार तक्रारी करूनही फीट जीने याची दखल घेतली नाही, असा आरोप पालकांनी केला.