राज्यातील वाढते महिलाविरोधी गुन्हे आणि अत्याचाराच्या विरोधात काँग्रेसच्या NSUI कडून एक पत्रस्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 4 वर्षांची चिमुकलीही महायुती सरकारच्या काळात सुरक्षित नाही तसेच बदलापूर येथील प्रकरणातील आरोपींवर अजूनही कारवाई झालेली नाही, असे महत्त्वाचे मुद्दे NSUI ने या मोहिमेदरम्यान उपस्थित केले आहेत.
यावेळी काँग्रेसकडून महिलासुरक्षा आणि सरकारचे अपयश यासंदर्भात अत्यंत गंभीर घटनांचा उल्लेख एका पत्रात केला आहे. या पत्रात त्यांनी बदलापूर, अकोला, ठाणे, डोंबिवली येथील अत्याचारांच्या प्रकरणांचे दाखले देत राज्य सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात NSUI कडून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये, हा जिजाऊ-सावित्रीचा महाराष्ट्र आहे. हा चालवण्याचा नैतिक अधिकार अशा निर्दयी निष्क्रिय आणि अमानुष महायुतीला असूच शकत नाही. ज्या सरकारला त्यांची प्रतिष्ठा महिला सुरक्षेपेक्षा जास्त महत्वाची वाटते, त्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. जर महाराष्ट्राच्या मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या या सरकारमध्ये थोडीही लाज शिल्लक असेल तर लवकरात लवकर महाराष्ट्रासमोर नाक घासा आणि राजीनामा द्या, असा आशय लिहिण्यात आला आहे.