हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आयपीएलच्या आगामी हंगामात पुनरागमन करू शकतो. आजवर आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी विख्यात असलेल्या युवराजकडे ‘दिल्ली कॅपिटल्स’ संघाचे प्रशिक्षकपद देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सच्या प्रँचायझीने प्रशिक्षकाच्या संभाव्य भूमिकेसाठी युवराज सिंगशी संपर्क साधला आहे. या संघाचे प्रशिक्षकपद सोडलेल्या रिकी पॉण्टिंगनेही याआधी तसे संकेत दिले होते. मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी फ्रँचायझी एका माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या महिन्यात युवराज सिंग गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आशीष नेहरा गुजरातचा प्रशिक्षक राहू शकतो. कारण गॅरी कर्स्टनच्या जागी गुजरातचा संघदेखील हिंदुस्थानी प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
..तर युवीची नवी इनिंग
युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक बनल्यास प्रशिक्षक म्हणून ही त्याची आयपीएलमधील नवी इनिंग असेल. युवी 2008 ते 2019 या कालावधीत आयपीएल खेळला आहे. 2019 मध्ये त्याच्या शेवटच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. या मोसमात मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आयपीएल कारकिर्दीतील चौथे विजेतेपद पटकावले होते. युवी त्याच्या 12 वर्षांच्या दीर्घ आयपीएल कारकिर्दीत पंजाब किंग्ज, पुणे वॉरियर्स इंडिया, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळलाय. आता चाहत्यांना त्याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल बघण्याची उत्सुकता लागली आहे.