महिला टी-20 वर्ल्ड कपच्या यजमानपदासाठी झिम्बाब्वे उत्सुक

बांगलादेशात निर्माण झालेल्या अराजक परिस्थितीमुळे येत्या ऑक्टोबरमध्ये होणारी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा तेथून हलवली जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन हिंदुस्थानने करावे असा प्रस्ताव आयसीसीने बीसीसीआयला दिला होता. मात्र बीसीसीआयच्या नकारानंतर झिम्बाब्वेने या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे आगामी स्पर्धा झिम्बाब्वे होईल की यूएईमध्ये याबाबत आयसीसी आपला निर्णय लवकरच जाहीर करील.

गेले काही वर्षे झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बाहेर फेकला गेला होता. मात्र 2018 आणि 2023 मध्ये वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीचे काही सामने आयोजित करून ते पुन्हा क्रिकेटच्या नकाशावर दिसू लागले. तसेच काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेत हिंदुस्थानविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिकाही खेळविण्यात आली होती. क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व दाखवण्यासाठी झिम्बाब्वेसाठी महिलांची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा नवसंजीवनी देणारी ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या मंडळाने या स्पर्धेबाबत आपण उत्सुक असल्याचे आयसीसीला कळवले आहे.