
नववर्ष 2026 च्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, 31 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन फूड आणि किराणा डिलिव्हर करणाऱ्या गिग आणि डिलिव्हरी वर्कर्सनी देशव्यापी संपाचा इशारा दिल्यानंतर या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची चांगलीच धांदल उडाली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला डिलिव्हरी सेवेत अडथळे येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्या झोमॅटो आणि स्विगी यांनी तातडीने मोठ्या घोषणा केल्या असून गिग वर्कर्सना अधिक पेमेंट आणि इन्सेंटिव्ह देण्याची ऑफर दिली आहे.
रिपोर्टनुसार, झोमॅटो आणि स्विगी आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना सध्या अधिक इन्सेंटिव्ह देणार आहेत. सणासुदीच्या काळात आणि जास्त मागणीच्या दिवसांत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हा कंपन्यांचा नेहमीचा उपाय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गिग वर्कर्स संघटनांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऑर्डर डिलिव्हरी सेवेत होणारा अडथळा कमी करण्याचा प्रयत्न आहे.
संघटनांच्या हाकेनंतर कंपन्यांची चिंता वाढली
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) यांनी दावा केला आहे की, लाखो कामगार चांगल्या मोबदल्यासाठी व कामकाजाच्या सुधारित अटींसाठी देशभरात संपात सहभागी होणार आहेत. उद्योगातील सूत्रांनुसार या संपाचा परिणाम झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, इंस्टामार्ट आणि झेप्टो यांसारख्या फूड डिलिव्हरी व क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या कामकाजावर होऊ शकतो. विशेष म्हणजे न्यू इयर ईव्हला मागणी सर्वाधिक पातळीवर असते, त्यामुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे.
झोमॅटोची ऑफर
झोमॅटोने नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 6 ते रात्री 12 या पीक अवर्समध्ये डिलिव्हरी पार्टनर्सना प्रत्येक ऑर्डरवर 120 ते 150 रुपये देण्याची ऑफर जाहीर केली आहे. तसेच दिवसात 3000 रुपयांपर्यंत कमाईची संधी उपलब्ध असल्याचेही सांगितले जात आहे; ही कमाई ऑर्डर संख्येवर आणि वर्करच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. याशिवाय ऑर्डर रिजेक्ट किंवा कॅन्सल केल्यावर लागू होणारी दंडात्मक कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
स्विगीचेही इन्सेंटिव्ह वाढवले
झोमॅटोप्रमाणेच स्विगीनेही इन्सेंटिव्ह वाढवण्याची घोषणा केली आहे. रिपोर्टनुसार, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीदरम्यान डिलिव्हरी पार्टनर्सना 10,000 रुपयांपर्यंत कमाईची संधी देण्यात आली आहे. नववर्षाच्या रात्री सायंकाळी 6 ते रात्री 12 या सहा तासांच्या कालावधीत अतिरिक्त 2,000 रुपयांपर्यंत पीक अवर कमाई दिली जाणार आहे, जेणेकरून सर्वाधिक व्यस्त ऑर्डरिंग काळात पुरेशा संख्येने रायडर्स उपलब्ध राहतील.
सध्या दोन्ही कंपन्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि संपामुळे सेवा खंडित होऊ नयेत यासाठी डिलिव्हरी पार्टनर्सना आकर्षक ऑफर्स देत आहेत.

























































