लोकसंस्कृती

168

डॉ. गणेश चंदनशिवे

हिंदुस्थानी लोकपरंपरेत सीमोल्लंघनाला महत्त्वाचे स्थान आहे. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱयाला ‘विजयादशमी’ असे संबोधले जाते. कुनीतीचा नाश करून सुनीती प्रस्थापित करण्यासाठी विजयोत्सव साजरा केला जातो. लोकपरंपरेत दसरा मोठय़ा थाटामाटात आणि उत्साहवर्धक वातावरणात एकमेकांचा आदर करत साजरा केला जातो. दसऱयाच्या अगोदर आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेपोटी नऊ दिवसाची घटमाळ बसवलेली असते. नऊ दिवसाच्या घटस्थापनेला ‘नवरात्र’ असे संबोधतात. या नवरात्रामध्ये आादिशक्तीने दाही दिशा भारलेल्या असतात. या दहा दिशांवर नियंत्रण मिळवून नवरात्र संपल्यानंतर दहाव्या दिवशी विजय मिळवलेला असतो. दसरा सण हा सीमोल्लंघन करून तसेच शस्त्रपूजा, शमीपूजा, अपराजिता पूजा करून सीमोल्लंघन साजरे केले जातात. तिसऱया प्रहरी गावाच्या ईशान्यकडील दिशेकडे शिवावर जाऊन सीमापूजन करतात. व आपटय़ाच्या झाडाचे पूजन करून आपटय़ाची पाने सोनं म्हणून देवाला वाहतात. सीमाल्लंघनाच्या दिवशी इष्टमित्र, वडीलधारे आप्तेष्टय़ांना लहानांनी सोनं देऊन उत्सव साजरा करतात. लोकपंरपरेत सीमोल्लंघना सबंधीत काही लोकगीते ऐकायला मिळतात.

दसऱयाच्या दिवशी इष्टमित्रांना आपटय़ाची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये अतिप्राचिन असून, तिची पाळेमुळे ही खोलवर रोवलेली आहेत. सीमोल्लंघनाच्या प्रथेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून शिवकालामध्ये मराठे सरदार मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूंना पराजित करून तो प्रदेश लुटायचे आणि सोन्यानाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणायचे. हे सरदार मोहिम फत्ते करून घरी परत आल्यानंतर दारात उभे राहून सरदाराची पत्नी किंवा बहीण शिलेदाराचे औक्षण करत असत. मुलुखात विजय मिळवून आणलेली संपत्तीतील एक नग ओवाळणीच्या ताटात भेट म्हणून टाकत असत. आणलेले सोननाणे घरात जाऊन देवाच्या पुढे ठेवत नंतर इष्टदेवता आणि आईवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेच्या स्मृती आधुनिक काळात, आपटय़ाचे पाने सोने वाटण्याची परंपरा स्मृतिरूपानेच शिल्लक राहिली आहे. आश्विन महिन्यात नवरात्रीनंतरचा दहावा दिवस हा श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय दिवस आहे.

दसरा हा सण शेतकरी, कष्टकरी यांच्याशी निगडित आहे पूर्वी हा एक कृषिविषयक लोकोद्योग होता. खरिपात केलेल्या पहिल्या पेरणीचे पीक घरात आणल्यानंतर हा सण साजरा केला जायचा. नवरात्रीमध्ये घटाखाली घटस्थापनेच्या दिवशी काळय़ा भुसभुशीत मातीत नऊ धान्याची रास भरली जायची. दहाव्या दिवशी घटाखाली वाढलेल्या धान्याचे अंकूर उमटून, देवाला वाहायले जायचे. प्रदेशपरस्वे ज्या भागात भाताचे पिक घेतले जाते. तेथील शेतातल्या भाताचा लोंब्या तोडून प्रवेशदारात तोरण बांधण्याची परंपरासुद्धा रूढ आहे. या कृषिविषयक परंपरेला पुढे धार्मिक सणाचा दर्जा होता आणि हळूहळू त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रात सुवासिनी एक दुसऱयाला हळदीकुंकू वाहून आपटय़ाची पाने सोने म्हणून देऊन मोठय़ा उत्साहात सीमोल्लंघन साजरे करतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या