
नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत गेल्या सहा वर्षांमध्ये झालेल्या कामांची आणि गैरव्यवहारांची श्वेतपत्रिका काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. नगर रचना, अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागासह अन्य विभागात झालेल्या सर्वच कामांची चौकशी करण्यासाठी पाच तात्पुरत्या समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आणण्यात आला आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत या प्रत्येक समितीमध्ये पाच सदस्यांनी नेमणूक महापौर करणार आहेत. श्वेतपत्रिका काढण्यासाठी या समित्यांची स्थापना म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नगरविकास विभागाला अप्रत्यक्ष दिलेले आव्हान असल्याने पहिली महासभा वादळी ठरणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पहिलीच महासभा येत्या २० फेब्रुवारी रोजी होत आहे. या सभेत एकूण २२ प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ठराव क्रमांक १३, १४ आणि १५ हे भाजपचे नगरसेवक मुनावर पटेल यांनी मांडले आहेत. नगर रचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागाने गेल्या सहा वर्षांत प्रशासकीय राजवटीत केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी तीन तात्पुरत्या समित्या स्थापन करण्याची मागणी पटेल यांनी आपल्या ठरावात केली आहे. या समितीमध्ये पाच सदस्यांची नेमणूक करावी असेही त्यांनी नमूद केले आहे. ठराव क्रमांक १६ आणि १७ हे भाजपच्या नगरसेविका शैला पाटील यांनी मांडले आहेत. या ठरावांमध्ये आरोग्य, नगर रचना आणि अभियांत्रिकी विभाग सोडून बाकी सर्व विभागात गेल्या पाच वर्षांत झालेल्या कामांची चौकशी करणाची मागणी पाटील यांनी केली आहे.
मंदा म्हात्रेच्या हॉस्पिटललाही विरोध
आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे बेलापूर येथील सेक्टर १५ मधील भूखंड शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्यासाठी सिडकोने दिला आहे. मात्र भूखंडाला १४ गावातील नगरसेवक भरत भोईर यांनी विरोध केला आहे. या रुग्णालयाच्या जागेत फेरबदल करण्यात यावा किंवा रुग्णालयाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी भाईर यांनी ठराव क्रमांक २२ मध्ये केली आहे. या प्रस्तावामुळे भाजपमध्ये असलेला अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चारही समित्यांमधील सदस्यांना प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची चौकशी करून अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यानंतर या प्रत्येक विभागाची श्वेतपत्रिकाही या सदस्यांच्या माध्यमातून काढली जाणार आहे.
भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या महासभेत महापौर सुजाता पाटील प्रशासकीय कारभाराची चिरफाड करण्यासाठी स्थापन केलेल्या या समित्यांमध्ये सदस्यांची नेमणूक करणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये भाजपचे तीन सदस्य असण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय राजवटीत नवी मुंबई महापालिकेत तीन हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी केला होता. याप्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. आता श्वेतपत्रिकेचा विषय पटलावर आल्यामुळे शिंदे गटात एकच पळापळ उडाली आहे.
कामांची चौकशी करण्यासाठी भाजपने आणलेल्या या ठरावांमुळे अधिकारीवर्गात खळबळ उडाली आहे. नगर रचना, अभियांत्रिकी आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा बीपी वाढला































































