
पदद्यावर विविध व्यक्तिरेखा जिवंत करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड (वय – 61) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयामध्ये त्यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 5 वाजता दादरमधील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. कोविड काळामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारी होते. मात्र गेल्या 8 दिवसात त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु शनिवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘सरदार’ या चित्रपटापासून झाली होती. त्यानंतर त्यांनी बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर, शहीद भगतसिंह, ठग्ज ऑफ हिंदुस्थान, डर्टी पिक्चर, पानिपत, बेल बॉटम, उरी, दंगल, पीके, भाग मिल्खा भाग, संजू, 83 यासह असंख्य हिंदी, मराठी चित्रपटांसह नाटकांमधील पात्र आपल्या मेकअपच्या जादूने जिवंत केली होती.
दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता मामूट्टी यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठीही त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले होते. 2013 मध्ये एका बंगाली चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
विक्रम गायकवाड यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या कलेने नाटकांच्या रंगमंचावरील, चित्रपटांच्या पडद्यांवरील अनेक पात्रांना जीवंत करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे.
बालगंधर्व, संजू, कपिल देव अशा असंख्य चित्रपटांत मेकप आर्टिस्ट म्हणून त्यांनी पात्र घडवले. pic.twitter.com/adzJ6bXwe9
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 10, 2025