
पश्चिम रेल्वेने देखभाल-दुरुस्तीसाठी 36 तासांचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकअंतर्गत शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून ते रविवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तब्बल 85 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग कार्यालय हटवण्यासाठी 5 व्या लाईनवर तसेच यार्ड मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. शनिवारी 38 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रविवारी 47 लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. ब्लॉक काळात उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. अहमदाबाद-बोरिवली एक्सप्रेस वसई रोडपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे रविवारी बोरिवली- अहमदाबाद एक्सप्रेस वसई रोडवरून सुटेल. ही ट्रेन बोरिवली आणि वसई रोडदरम्यान रद्द केली जाईल. तसेच शनिवारी व रविवारी बोरिवली-नंदुरबार एक्सप्रेस बोरिवलीऐवजी भाईंदर येथून सुटणार आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी वसई व भाईंदरला जावे लागणार आहे.
मध्य रेल्वेवर उद्या मेगाहाल
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेतला आहे. धिम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांची त्रेधातिरपीट उडणार आहे. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक काळात सीएसएमटीहून वाशी आणि गोरेगावला होणारी लोकल वाहतूक बंद राहील.