पालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे झाडे पुणेकरांच्या मुळावर! दोघांचा जीव गेल्यानंतरही कारभार ढिम्मच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tree-collapse-on-car

पुण्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी न केलेली तयारी आणि दुर्लक्ष यांमुळे पुणेकरांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. शहरातील कर्वेनगर आणि पेशवे पार्क या ठिकाणी धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळल्याने दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर, नगर रस्त्यावर होर्डिंग्ज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, पावसाळ्यापूर्वी याची पाहणी करून करावयाच्या उपाययोजना न केल्याने पुणेकरांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

पेशवे उद्यानात बुधवारी (28 रोजी) धोकादायक झाड रिक्षावर कोसळून एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. त्याआधी सोमवारी अलंकार पोलीस ठाण्याजवळील रस्त्यावर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अवघ्या तीन-चार दिवसांत अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणांचा बळी गेला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत झाडांची पाहणी केली असती, तर या अपघातांना आळा घालता आला असता. उघड्या मुळ्या, एकाच बाजूला कललेली झाडे, वजनाने वाकलेल्या फांद्या ही धोक्याची स्पष्ट लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी अशी झाडे आणि फांद्या कापण्याची जबाबदारी पालिकेची असली, तरी ती जबाबदारी केवळ कागदावरच राहिली आहे. गेल्या वर्षीही झाड पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती, तरीही प्रशासनाने यापासून काहीच घडा घेतला नाही, असे दिसून येते. सार्वजनिक ठिकाणांतील झाडांची जबाबदारी महापालिकेवर आहे, तर खासगी जागांतील झाडांची जवाबदारी संबंधित सोसायटी किंवा मालकांची आहे. मात्र, झाडांच्या फांद्या कापण्यासाठीही पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत होणारा वेळ आणि दिरंगाईही अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. दरवर्षीच धोकादायक झाडे आणि कोसळणारे होर्डिंग्ज या समस्या नव्याने समोर येतात; पण त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत

झाड पडून मृत्यू झालेल्या घटना

  • 28 मे रोजी पेशवे पार्क परिसरातून जाणाऱ्या रिक्षावर झाड कोसळले. यात रिक्षाचालक आणि प्रवासी महिला जखमी झाले. उपचारांदरम्यान गंभीर जखमी झालेल्या 76 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.
  • 26 मे रोजी कर्वेनगर परिसरात झाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
  • गतवर्षी ओंकारेश्वर पुलानजीक एका टपरीसमोर चहा पीत असताना डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.
  • याशिवाय गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांत अनेक झाडपडीच्या घटना समोर आल्या आहेत.

होर्डिंग्जचाही धोका
पावसाळ्याच्या जोरदार वाऱ्यांमध्ये नगर रस्ता परिसरात एक मोठे होर्डिंग कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, शहरात उभ्या असलेल्या असंख्य जड आणि कमकुवत पाया असलेल्या होर्डिंग्जच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.