
रखडलेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, महामार्गाच्या क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक, भरधाव वाहने यामुळे मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांसाठी अक्षरशः कर्दनकाळच ठरला आहे. गेल्या पंधरा वर्षांत रायगड जिल्हा हद्दीत 5 हजार 221 अपघात झाले आहेत. यामध्ये तब्बल 1 हजार 285 बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मात्र इतकी भयंकर परिस्थिती असतानादेखील या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी लटकलेले असून अजून किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरून दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टन एवढी वाहतूक होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 15 वर्षांपासून रखडले आहे. तसेच इंदापूर पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
32 हॉटस्पॉट
रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करतात. मुंबई-गोवा महामार्गावर 32 अपघातप्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाच्या 500 मीटरमधील, लोणेरे बस स्थानकाच्या 200 मीटरमध्ये, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले या ठिकाणांचा समावेश आहे

























































