लेख – भारत, चीन, अमेरिका संबंध : बुद्धिबळाचा खेळ

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारतीय नेतृत्व चिनी काव्याला बळी पडणार की काय, या भावनेने अनेक त्रस्त आहेत. पण हीच काळजी चीनला आहे. भारत-अमेरिका ताणलेले संबंध पूर्ववत होऊ शकतात आणि तसे झाले तर भारत काय करेल, या विचाराने चीन त्रस्त आहे. चीन सातत्याने याच विचारांच्या दडपणाखाली कसा राहील, याची खबरदारी भारताने घ्यायला हवी. शेवटी भारत, चीन, अमेरिका संबंध म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे. वेगवेगळ्या चाली करून आपण आपले राष्ट्रीय हित जपले पाहिजे.

घनिष्ठ मैत्रीची इच्छा व्यक्त करीत भारताच्या दौऱ्यावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री लगेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दौऱयावर गेले. तिकडे चीन-पाकिस्तान संबंध पोलादासारखे मजबूत होते आणि राहतील असे त्यांनी सांगितले. हिंदी-चिनी भाई-भाईच्या घोषणांच्या मागून भारताशी दगाबाजी करणारा चीन भारतीयांच्या स्मृतीत आहे. त्यात चीनच्या अशा वागण्यामुळे त्याच्याविषयीचा संशय अधिकच वाढतो. अर्थात चीन तसाच राहिला असला तरी काळानुसार भारत बदलला आहे आणि आपले राष्ट्रीय हित राखून आहे.

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांतील सत्ताधाऱयांना हाताशी धरून भारताला जेरीस आणण्याचे कार्य चीन अव्याहतपणे करीत आहे. नक्षलवाद्यांना, ईशान्य पूर्व भागातील फुटीरतावादी गटांना शस्त्रs आणि पैसा पुरवणे, कश्मीर आणि खलिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणे, अशा अनेक भारतविरोधी कारवायांमध्ये चीनचा सहभाग असतो. अलीकडे नेपाळ आणि मालदीवसारख्या देशांनी घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमागेही चीनची आर्थिक ताकद उभी होती.

चीनविरोधी देशांशी संबंध दृढ करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खूप उशिरा सुरुवात झाली. जपान, दक्षिण कोरिया, मंगोलिया, फिलिपाईन्स, व्हिएतनाम या देशांबरोबर भारताने राजनैतिक आणि लष्करी संबंध वाढवायला सुरुवात केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांनी बनवलेली ‘क्वाड’ नावाची संघटना चीनच्या इंडो-पॅसिफिक भागातील दादागिरीला आळा घालण्यासाठी अस्तित्वात आली. डोकलाम संघर्षामुळे चीनला टक्कर देऊ शकतो, असा आत्मविश्वास इतर देशांना भारताविषयी वाटू लागला.

चीनविरोधात अमेरिकेची अनुकूल भूमिका असतानाही, भारत अमेरिकेमागे वाहवत गेलेला दिसत नाही. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचा सर्वकाळ मित्र नसतो, हे आपण अनुभवातून शिकलो आहोत. त्याची प्रचीती अमेरिकन आयात शुल्काच्या रूपात आपल्याला आली आहे. रशियन तेलाचे कारण पुढे करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावायची घोषणा केली. पाकिस्तान, बांगलादेश या भारताच्या शत्रूंशी अधिक जवळीक साधून, कालपर्यंत भारताला मित्र म्हणवणाऱया अमेरिकेने एका क्षणात भारताशी शत्रुत्व पत्करले आहे. अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची जनभावना आहे.

1962 साली चीननेही हेच केले होते. पण या वेळी अमेरिकेबाबत आपण बेसावध होतो काय? अमेरिका आपल्याला कधीही दगा देऊ शकते, याची जाणीव असल्यानेच भारताने आपला जुना मित्र रशियाची साथ सोडली नाही.

अमेरिकेपासून दूर जाऊ लागलेल्या भारताला आपल्या समूहात ओढण्यासाठी चीन तत्परतेने पुढे आला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या मुखपत्रातून ड्रगन आणि हत्ती एकत्र नाचू शकतात, भारताच्या पंतप्रधानांचे चीनमध्ये स्वागत आहे वगैरे सकारात्मक मजकूर लगेच छापून आले. चीनची बाजारपेठ भारतीय मालासाठी खुली आहे, असे सांगितले जाऊ लागले. खतं, रेअर अर्थ मेटल आणि विशिष्ट यंत्रसामुग्री भारतासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनदेखील चीनने दिले आहे. सीमारेषेवरून व्यापार सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आणि याबाबत नेपाळने घेतलेल्या आक्षेपाकडे चीनने सध्यातरी कानाडोळा केला आहे. चीनच्या भारतातील राजदूतांनी भारत आणि चीन आशियाई विकासाचे ‘डबल इंजिन’ आहे, असे संबोधले. अर्थात यामुळे हुरळून जाण्याइतका भारत बालीश नाही. चीन विशिष्ट हेतूने आपल्याशी मैत्री करून इच्छित आहे, हे आपण जाणतोच आणि आपणदेखील आपले हेतू साध्य करण्यासाठीच चीनशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवू इच्छितो.

ऑगस्ट महिना अखेरीस होणाऱ्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)’ या संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जात आहेत. मोदींची ही चीन भेट सात वर्षांनंतर होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या होणाऱया भेटीकडे जगाचे लक्ष आहे. या भेटीचे प्रतीकात्मक मूल्य जास्त आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी आणि एकांगी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून या भेटीकडे पाहिले जात आहे.

तिकडे अफगाणिस्तानात चीन-पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अशी त्री सदस्यीय बैठक नुकतीच पार पडली. अफगाणिस्तानातील तांबे, सोने, लोखंडाच्या खाणी आणि खनिज तेलाचे मिळू शकणारे साठे चीनला अफगाणिस्तानकडे आकर्षित करत आहेत. ‘चीन पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी)’ या नावाने ओळखल्या जाणाऱया प्रकल्पाचा विस्तार अफगाणिस्तानात करावा अशी चीनची इच्छा आहे.

अमेरिका आणि पाकिस्तान हे आणखी दोन घटक भारताच्या राजकारणावर प्रभाव टाकत असल्याने इथल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर सोपे सुटसुटीत मिळणार नाही. त्यातून मार्ग काढणे हा कूटनीतीचा भाग आहे. त्यासाठी लागणारी दीर्घकाळ पाठपुरावा करण्याची क्षमता आणि वाट पाहण्याची क्षमता, हे गुण भारतात आहेत.

भारताच्या दौऱयावर आलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौरा आटोपून लगोलग पाकिस्तानच्या भेटीस गेले. भारताशी मैत्रीचे नाटक करून भारताच्या शत्रूशी हातमिळवणी करणारा चीन पाहून बहुतेकांना दगाबाज चीन आठवला. परत भारतीय नेतृत्व चिनी काव्याला बळी पडणार की काय, या भावनेने अनेक त्रस्त आहेत. पण हीच काळजी चीनला पण आहे. भारत-अमेरिका ताणलेले संबंध पूर्ववत होऊ शकतात आणि तसे झाले तर भारत काय करेल, या विचाराने चिनी त्रस्त आहे. येणाऱ्या काळात चीन सातत्याने याच विचारांच्या दडपणाखाली कसा राहील, याची पूर्ण खबरदारी भारताने घ्यायला हवी. शेवटी भारत, चीन, अमेरिका संबंध म्हणजे बुद्धिबळाचा खेळ आहे. वेगवेगळ्या चाली करून आपण आपले राष्ट्रीय हित जपले पाहिजे. ते कसे जपले जाते यावर भविष्यातील बरेच काही अवलंबून आहे.