
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बूट फेकणाऱ्या आरोपी वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध अवमान कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अवमान नोटीस बजावल्याने सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱया वकिलाला जास्त महत्त्व मिळेल. ही घटना स्वतःहून संपली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती सूर्य कांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयात घोषणा देणे किंवा बूट फेकणे हे स्पष्टपणे न्यायालयाचा अवमान आहे. परंतु कायद्यानुसार कारवाई करायची की नाही हे संबंधित न्यायाधीशांनी ठरवायचे आहे, असे खंडपीठाने म्हटले. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित करण्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना देशभरातील न्यायालयांमध्ये घडलेल्या अशा घटनांचा तपशील गोळा करण्यास सांगण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर बार काwन्सिल ऑफ इंडियाने वकील राकेश किशोर यांचा परवाना तत्काळ निलंबित केला. त्या वेळी सरन्यायाधीश गवई यांनी शांतता राखली आणि सुरक्षा कर्मचाऱयांना घटनेकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आणि वकिलाला इशारा देऊन सोडून देण्यास सांगितले होते. सरन्यायाधीशांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा देशभरात निषेध करण्यात आला होता.





























































