
सप्टेंबर 2025 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा नुकसानभरपाईत समावेश करण्यात आला होता. या 14 तालुक्यांतील 8 लाख 27 हजार 118 शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने या अतिवृष्टी व पूरस्थितीमध्ये झालेल्या नुकसानभरपाईसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. निधी उपलब्ध करून दिवाळीपूर्वी देण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार निधीवाटपदेखील करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिह्यात 8 लाख 27 हजार 118 शेतकऱयांसाठी 846 कोटी 96 लाख निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 33 हजार 515 शेतकऱयांच्या बँक खात्यावर नुकसानभरपाईची मदत जमा झाली आहे. अशी 698 कोटी 62 लाख रुपये या शेतकऱयांना दिले आहेत. मात्र, ई-केवायसी, तांत्रिक कारणासह सामाईक क्षेत्राचे संमतीपत्र न देणे, बँकांची माहिती न देणे, बाहेरगावी असणे, या कारणामुळे अजूनही 1 लाख 93 हजार 603 शेतकरी 148 कोटी 34 लाख मदतीपासून वंचित राहिले आहेत.
नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केले होते; परंतु बहुतांश शेतकऱयांकडे फार्मर आयडी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने नियमांत शिथिलता आणून ई-केवायसी बंधनकारक केली. ई-केवायसीसाठी राज्य शासनाने शिबिरे घेतली आहेत; परंतू अजून नुकसानभरपाई न दिलेल्या शेतकऱयांना रब्बी हंगामाचे बी-बियाणे, खते घेता आली नसल्याची त्यांची खंत आहे. शासनाच्या पोर्टलवर ही रक्कम अदा झालेली दिसत आहे. मात्र, केवळ ई-केवायसी,फार्मर आयडीमुळे ही रक्कम लटकली आहे. ई-केवायसी नसली, तरी आता फार्मर आयडी शेतकऱयांसाठी गरजेचे आहे.
सर्वाधिक वंचित कर्जत तालुक्यात
अहिल्यानगर जिह्यात नुकसानभरपाईच्या मदतीपासून कर्जत तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक वंचित आहेत. या तालुक्यात 39 हजार 59 शेतकऱयांना अद्यापही मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वंचित शेतकऱयांची संख्या पुढीलप्रमाणे ः अहिल्यानगर 5 हजार 721, अकोले 606, जामखेड 15 हजार 976, कोपरगाव 7 हजार 253, नेवासा 18 हजार 305, पारनेर 12 हजार 167, पाथर्डी 37 हजार 506, राहाता 8 हजार 435, राहुरी 7 हजार 80, संगमनेर 3 हजार 814, शेवगाव 17 हजार 364, श्रीगोंदा 10 हजार 480, श्रीरामपूर 9 हजार 891.

























































