मुंबईहून गावात आलेल्या 10 जणांचे ढोल, ताशाच्या गजरात स्वागत….’हे’ आहे कारण…

6589

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातून गावाकडे परतणाऱ्यांमुळेच कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याचे गावकऱ्यांना वाटत असल्याने इतर जिल्ह्यातून गावात परतणाऱ्यांचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. मुंबई , पुण्याहून पाहुणे येणार कळले की गावकरी भीतीने दगड, काटे, झाडांच्या फांद्या, मुरुम रस्त्यावर टाकून गावाकडे येणारे रस्ते बंद करतात. अशा परिस्थिती असताना शिरूर तालुक्यातील पिंपळनेरमध्ये मात्र मुंबईहून गावात आलेल्या 10 जणांचे बँड आणि ढोल, ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्याला कारणही तसेच विशेष आहे. गावात आलेल्या पाहुण्यांनी गावात प्रवेश करताच 28 दिवस होम क्वारंटईन होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोरोना फैलावण्याची गावकऱ्यांची भीती गेली आणि त्यांनी आनंदाने मुंबईकरांचे स्वागत केले.

बीड जिल्ह्यातच शिरुर तालुक्यातील पिंपळनेर गावामध्ये दुपारी दोन काळ्या पिवळ्या टॕक्सीमध्ये 10 जण मुंबईहून गावाकडे आले. ते गावात आल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाल्यावर त्यांनी त्यांची रस्त्यावरच भेट घेत विचारपूस केली. मुंबईच्या पाहुण्यांनी आम्ही घरामध्ये लगेच होमक्वॉरंटाईन होत आहोत बाहेर फिरणार नाही. 28 दिवस घराबाहेर पडणार नाहीत असे जाहीर केले. त्यामुळे गावकऱ्यांना भीती राहिली नाही. माजी पंचायत समिती सदस्य सुरेश उगलमुगले व पिंपळनेरचे सरपंच बबनराव जायभाये, उपसरपंच बाळु बडे यांनी मुंबईकरांचे ढोल, बँडच्या गजरात स्वागत करून त्यांना घरापर्यंत सोडले. आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, माणसांसोबत नाही, त्यामुळे मुबईच्या पाहुण्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याने त्यांना गावात प्रेश दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या