आयटी क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार निर्माण होतात. असं असलं तरी या क्षेत्रातही आता मंदीचे सावट असल्याचे दिसून येतंय. कारण आयटी क्षेत्रातील फ्रेशर्सना नोकरीची ऑफर मिळूनही प्रत्यक्षात नोकरी काही मिळताना दिसत नाहीय. मागील दोन वर्षांत देशातील किमान 10 हजार फ्रेशर्सना नोकरीची ऑफर देण्यात आली. मात्र आयटी कंपन्यांनी अद्याप त्यांना नोकरीत रुजू केलेले नाही. आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे. आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीतसिंग सलुजा यांनी सांगितले की, फ्रेशर्स उमेदवारांना टीसीएस, इन्पहसिस, विप्रो, झेन्सर आणि एलटी आयमाईंटड्री या कंपन्यांमध्ये ऑफर देण्यात आली होती. कॅम्पस प्लेसमेंट आणि अन्य पद्धतीने ऑफर मिळाली. मात्र अद्याप त्यांना कंपन्यांनी जॉईन करून घेतलेले नाही. या फ्रेशर्सनी कामगार संघटनेशी संपर्क साधला आहे. त्यांच्या तक्रारींमध्ये मोठय़ा आयटी कंपन्यांचीही नावे आहेत. उत्तर अमेरिका व युरोपमधील व्यावसायिक अनिश्चिततेमुळे नवीन लोकांना रुजू होण्यास विलंब लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम आहे.