
सामना ऑनलाईन,संभाजीनगर
पैठण रोडवरील गोलवाडी येथे राहणाऱ्या एका उद्योगपतीच्या बंगल्यात २५ लाखांचा दरोडा टाकणाऱ्या तीन दरोडेखोरांना मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आज प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. घरफोडीची ही घटना सन २०१५ मधली आहे. उद्योगपती प्रवीण लक्ष्मीकांत तुलसीयान हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेलेले होते. बंगल्यात दोन वॉचमन आणि एक स्वयंपाकी होते.
दि. ३० मे २०१५ च्या मध्यरात्री वॉचमन संजय वाघ आणि भीमराव दिवेकर बंगल्यातील कम्पाऊंडमधील केबीनमध्ये असताना त्यांना अंधारात कम्पाऊंडवरून उड्या मारून पाच ते सहा दरोडेखोर बंगल्याच्या आवारात शिरल्याचे दिसून आले. त्यांचे चेहरे बुरख्याने झाकलेले व फडक्याने बांधलेले होते. या दरोडेखोरांनी केबीनमध्ये असलेल्या संजय वाघ याच्या पोटाला चाकू लावून धमकावत बंगल्याच्या चाव्या मागितल्या. त्याच वेळी भीमराव दिवेकर हे सुध्दा केबीनकडे आले असता दरोडेखोरांनी दोघांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतले. वॉचमनला सोबत घेत दरोडेखोरांनी बंगल्यातील स्वयंपाकघरात झोपलेल्या राजकुमार रॉय याला वॉचमनला उठवायला सांगितले आणि रॉयने स्वयंपाकाच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर तिघांना दरोडेखोरांनी एका खोलीत डांबले. तीन दरोडेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवली तर उर्वरित दरोडेखोरांनी बंगल्यातील खोल्यांची झडती घेत लूट केली.
२० लाखांचे दागिने लंपास
दरोडेखोरांनी बंगल्यातील कपाटे उचकटली. कपाटातील रोख ४ लाख रुपये आणि २० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा एवूâण २५ लाखांचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोरांनी पहाटेपर्यंत धुमावूâळ घातला व नंतर ते पळून गेले. त्यानंतर वॉचमनने बंगल्याच्या नजीक राहणाऱ्या गिरधर वैजनाथ संगोनेरीया यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी सातारा पोलीस ठाण्यास दरोडा पडल्याची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरोडेखोरांना ओळखले
वॉचमन आणि स्वयंपाकी यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी थांबलेल्या तीनपैकी एका दरोडेखोरास तंबाखू खाण्याची सवय होती. पाळत ठेवत असताना त्याने तंबाखू खाण्यासाठी तोंडावरचा रुमाल काढला होता. त्यावेळी वॉचमन संजय वाघ याने या दरोडेखोराचा चेहरा पाहिलेला होता. तो त्याच्या चांगलाच लक्षात राहिल्यामुळे जेव्हा पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले तेव्हा या वॉचमनने दरोडेखोरांना ओळख परेडमध्ये ओळखले होते.
दरोडेखोरांना लावला मोक्का
पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या पथकाने तपास करून सहा जणांना अटक केली. तपासादरम्यान सहा जणांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कलमान्वये गुन्हा केल्याचे सिध्द झाल्यामुळे या दरोडेखोरांना मोक्का लावण्यात आला. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती यांनी तपास करून मोक्काच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
तिघांना शिक्षा, दोघे निर्दोष, एकाचा मृत्यू
खटल्याची अंतिम सुनावणी मोक्काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली. विशेष वकील सुदेश शिरसाठ यांनी १६ साक्षीदार तपासले. यामध्ये वॉचमन, सोन्याचे व्यापारी, फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने अजय रमेश वाहुळ (२०, एकता कॉलनी, सातारा), स्वप्निल ऊर्पâ गोलू सुभाष मिसाळ (२०, मनपा कॉलनी), अरुण बाबुराव शिनगारे (२२, मिलिंदनगर) या तिघांना भादंवि ३९२, ३९५ आणि ३९७ या कलमान्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरी. तसेच भादंवि ३४२ कलमान्वये प्रत्येकी १ वर्ष सक्तमजुरी, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. खटल्याच्या सुनावणी दरम्यान दरोडेखोरांचा म्होरक्या विठ्ठल शिवाजी वाघमारे (४०, रेणुकानगर) हा मरण पावला, तर विनोद चाबुकस्वार आणि संतोष खरे या दोघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र या सर्व आरोपींना न्यायालयाने मोक्काच्या गुन्ह्यातून पुराव्याअभावी निर्दोष ठरवले.
























































