102 कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडले

doctor

एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसताना रत्नागिरी जिह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कंत्राटी बीएएमएस डॉक्टर सांभाळत आहेत. मात्र जिह्यातील 102 कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडवले आहे. हे बीएएमएस डॉक्टर 24 तास सेवा देत आहेत. मात्र त्याची अवस्था बिनपगारी फुल अधिकारी अशी झाली आहे. कारण कंत्राटी डॉक्टरांना गेले पाच महिने पगार मिळालेला नाही.

रत्नागिरी जिह्यात 67 प्राथमिक आरोग्य केंद्र व 2 उपजिल्हा रुग्णालय आहेत. एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात येऊन सेवा देण्याकडे पाठ फिरवत असल्याने एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर गेली होती. त्यानंतर बीएएमएस डॉक्टरांना पंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. एकूण 102 डॉक्टरांची पंत्राटी पद्धतीने नेमणूक करून कोसळणारी आरोग्य यंत्रणा सावरण्यात आली. कंत्राटी डॉक्टर प्रति महिना 40 हजार वेतनावर काम करू लागल्यानंतर एकदाही त्यांना वेळेवर पगार सरकारने दिलेला नाही. तरीही सेवेचे व्रत घेतलेले हे डॉक्टर काम करत राहिले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने, पाच महिने पगार न झाल्याने डॉक्टरांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.