
सोलापुर शहरातील कोरोना बाधिताची संख्या तब्बल 21 ने वाढून 102 इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या 3 रुग्णांची चाचणी 14 दिवसांच्या उपचारानंतर निगेटिव्ह आली. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत आज या तीन निगेटिव्ह रुग्णांना निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केले आहे.
आतापर्यंत सोलापुरात कोरोनाची 1650 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1455 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 1353 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. गुरूवारी एका दिवसात 205 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 184 निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह आहेत. आज जे 21 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले त्यात 14 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जरी सोलापुरात रुग्ण वाढत असले तरी उपचारांनंतर बरे होणाऱ्यांची संख्याही येत्या काही दिवसात वाढलेली दिसेल असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. नागरिकांनी पॅनिक होऊ नये. प्रशासनानं दिलेले आदेश पाळावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.



























































