104 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या

कोरोनाच्या महामारीशी झुंज देताना अनेक तरुणांचा लढा अपयशी ठरल्याच्या बातम्या येत असतानाच पालघरमधील एका 104 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला सपशेल चितपट केले आहे. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे आजोबा कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी जाण्यास निघाले तेव्हा स्वतः जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी उपचार केंद्रात येऊन त्यांना पुष्पगुच्छ देत निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

पालघरच्या वीरेंद्रनगरात इंगळे कुटुंब राहते. या कुटुंबातील आजोबा शामराव इंगळे यांना सात दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले. त्यांच्या शरीरात कोरोनाचा मोठा संसर्ग झाल्याने अत्यवस्थ स्थितीत त्यांना जे. जे. आरोग्य पथकाच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. त्यामुळे इंगळे कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीला या आजोबांना अन्नपाणीही जात नव्हते. मात्र जगण्याची आस आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला. सहा दिवसांच्या औषधोपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले.

 पोटभर आशीर्वाद

उपचार केंद्रात दाखल झाल्यानंतर भीतीमुळे रुग्णाची प्रकृती अनेकदा खालावते, पण शामराव इंगळे आजोबांनी मन खंबीर ठेवत कोरोनाशी लढा दिला आणि तो जिंकलाही. या सहा दिवसांत उपचार केंद्रातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी त्यांची योग्य ती काळजी घेतली. उपचार केंद्रातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शामराव इंगळे आजोबांच्या चेहऱयावर हसू होते आणि त्यांनी आम्हा सर्व कर्मचाऱयांना पोटभर आशीर्वाद दिला, असे या केंद्रातील डॉ. सचिन नवले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या