आचारसंहितेपूर्वी विधानसभा सदस्यांवर 108 कोटींची खैरात, सर्वपक्षीयांना केले खूश

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारने विधानसभेतील 272 सदस्यांना खूश करून टाकले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत नियोजन विभागाने 108 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करून टाकले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत 2024-24 या आर्थिक वर्षासाठी 2 हजार 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वित्त विभागाने अर्थसंकल्पीय निधीपैकी 1 हजार 146 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार या निधीचे वितरण सर्व जिल्ह्यांना करण्यात आले आहे. आता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत विधानसभेच्या 272 सदस्यांना प्रत्येकी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यानुसार 108 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय नियोजन विभागाने घेतला आहे.

या निधीतून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम राबवण्यात येईल तसेच मोठी बांधकामेही करता येतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. या निधीचे तात्काळ वितरण करण्याचे आदेशही नियोजन विभागाने जारी केलेले आहे. सर्वपक्षीय आमदारांना हा निधी मिळणार आहे.