
अकरावी प्रवेशाचा ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असून ऑनलाईन फी भरल्यावर विद्यार्थ्यांना खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज येतो मात्र वेबसाइटवर फी भरल्याचे दाखविण्यात येत नसल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडत आहे.
विविध प्रकारची संमतीपत्रासाठी अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना सायबरकॅफेची वाट धरावी लागत आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरूवात करताच प्रवेशाची वेबसाइट काही काळ ठप्प होती. रविवारीही वेबसाइट खूपच मंद गतीने सुरू होती. एवढा वेळ खर्च करून भरलेल्या अर्जानंतर 225 रुपये प्रवेश प्रक्रिया शुल्क विद्यार्थी भरतात. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यातून पैसे कट झाल्याचे मेसेज आले. पण वेबसाइटवर मात्र पैसे जमा न झाल्याचे दाखवत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना याबाबत तक्रार निवारणासाठी कोणतीही हेल्पलाइन अथवा विशेष कक्ष नसल्याने पालक आणि विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
अतिरिक्त शुल्काचे पैसे परत केले जातील
वेबसाइटचा वेग वाढून येणाऱया अडचणी सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या पालकांचे शुल्क कट होईल, पण अर्जावर ते भरले नसल्याचे दाखवत असल्यास ते पैसे पालकांना परत मिळतात. काही पालकांनी एकदा शुल्क भरून झाले नाही म्हणून दोनवेळा पैसे भरले त्यांना त्यांचे अतिरिक्त पैसे परत दिले जातील, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.























































