
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मतदान यंत्रात गडबड करून निकाल फिरविल्याची तक्रार राज्यातील काही पराभूत उमेदवारांनी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातील 11 विधानसभा मतदारसंघांत 19 जुलैपासून ईव्हीएमची निवडणूक आयोगाकडून पडताळणी सुरू होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बहुतांश पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची फेरपडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील ज्या उमेदवारांनी यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडे आवशक शुल्क जमा केले आहे त्यांच्या मागणीनुसार संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलर याची तपासणी व पडताळणी भारत
इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगळूर यांच्या टेक्निशियनकडून उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
पडताळणी म्हणजे नेमके काय करणार? : राजन विचारे
ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनोरमा नगर ठामपा शाळा क्रमांक 128 मतदान केंद्र क्रमांक 68 वरील बॅलेट युनिट, पंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटच्या संपूर्ण पडताळणीसाठी मी अर्ज केला आहे. त्यासाठी 47 हजार 200 रुपयांचा भरणा केला आहे. त्यासंदर्भात ईव्हीएम मशीनच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोपंट्रोलर याची तपासणी व पडताळणी 19 जुलै रोजी करण्यात येणार आहे. ही पडताळणी म्हणजे नेमके आपण काय करणार आहात, अशी विचारणा शिवसेना नेते राजन विचारे यांनी केली आहे.
102 बॅलेट युनिटची तपासणी
11 मतदारसंघातील 102 बॅलेट युनिट आणि 58 पंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटची तपासणी होणार आहे. हडपसर मतदारसंघात सर्वाधिक 54 बॅलेट युनिट आणि 27 पंट्रोल युनिटची तपासणी होईल.