दशक्रिया विधीसाठी गेलेले 11 जण बुडाले; अमरावतीच्या वर्धा नदीत दुर्घटना

अमरावती जिह्यातल्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडल्याची  माहिती मिळाली आहे. त्यापैकी 4  मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नावाडीवगळता नावेत बसणारे इतर सर्व एकमेकांचे नातेवाईक होते. ते लगतच्या गाडेगाव येथील मटरे कुटुंबियांकडे दशक्रियेच्या विधीसाठी  आले होते.

 एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते. अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. बुडणायांमध्ये नारायण मटरे (45), अश्विनी खंडाळे (25), वृषाली वाघमारे (19), अतुल वाघमारे (25), वांशिका शिवणकर (2), निशा मटरे (22), किरण खंडाळे (28), अदिती खंडाळे (13), मोहिनी खंडाळे (11), पियुष मटरे (8), पूनम शिवणकर (26) यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. बुडालेल्यांत बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाडय़ासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.

 क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याने बोट उलटली

 नागपूर आणि अमरावती जिह्याच्या संगमावर  हे ठिकाण आहे. झुंज या पर्यटन क्षेत्रावर या महिन्यात हजारो भाविक येत असतात. वर्धा नदीचे पात्र मोठे असल्याने तिथे बोटिंग करण्यात येते. मंगळवारी क्षमतेपेक्षा जास्त लोक  या बोटीमध्ये बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज आहे. दशक्रिया विधीसाठी जमलेल्या एकाच कुटुंबातील लोक या बोटीतून प्रवास करत होते, अशी माहिती स्थानिक आमदार  देवेंद्र भुयार यांनी मदतकार्यादरम्यान दिली.

आपली प्रतिक्रिया द्या