रक्षाबंधनासाठी आईसोबत मामाच्या घरी चाललेल्या 11 वर्षीय चिमुरडीचा अपघाती झाल्याची घटना मुंबईतील कॉटन रोड स्टेशनजवळ घडली. परी जैन असे मयत चिमुरडीचे नाव आहे. आईसोबत इलेक्ट्रिक स्कूटीवरुन मामाकडे जात असताना स्कूटी घसरल्याने मायलेकी पडल्या आणि जखमी झाल्या. दोघींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र परीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
परळ येथील रहिवासी असलेल्या निशा सुरेश जैन सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास इलेक्ट्रिक स्कूटरवरून काळाचौकी येथील म्हाडा कॉलनीकडे जात होत्या. निशाचे पती सुरेश हे दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. निशाची 11 वर्षांची मुलगी परी जैन ही आईसोबत स्कूटीवर बसली होती.
कॉटन रोड स्टेशनजवळ झाखरिया रोडवर इलेक्ट्रिक स्कूटर उजवीकडे वळवताना निशाचे नियंत्रण सुटले आणि स्कूटर घसरली. निशा आणि परी दोघीही खाली पडल्या आणि जखमी झाल्या. निशाची स्कूटर दिसत नसल्याने तिचा पती पाहण्यासाठी मागे आला असता त्याला रस्त्यात गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहिले असता पत्नी जखमी तर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली.
काळाचौकी पोलिसांच्या मदतीने सुरेशने दोघींनाही केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र परीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. काळाचौकी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.