चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 162 वर; 80 जणांची कोरोनावर मात

481

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी 12 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या पाच जणांचा सहभाग आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यामध्ये 150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. शुक्रवार दुपारपर्यंत त्यामध्ये 12 नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण संख्या 162 झाली आहे. आतापर्यंत 80 नागरिक कोरोनामुक्त झाले असून सध्या 82 नागरिक जिल्ह्यात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील 162 कोरोनाबाधितांमध्ये अन्य जिल्ह्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. हे चारही रुग्ण राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर शहरातील 21 वर्षीय युवकाचा समावेश आहे. हा युवक सिकंदराबाद येथून 1 जुलैला आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. इंदिरानगर चंद्रपूर येथील 21 वर्षीय महिला हैद्राबाद येथून 1 जुलै रोजी परतली होती. ती आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होती. दाद महाल वार्डातील आणखी एक 21 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला जळगाव येथून आल्यानंतर 29 जूनपासून संस्थात्मक अलगीकरणात होती. आणखी एक रुग्ण भानापेथ वॉर्डमधून आला असून हा 29 वर्षीय युवक हैदराबादवरून परत आला होता. आता तो खाजगी हॉटेलमध्ये संस्थात्मक अलगीकरणात आहे. याशिवाय बिहार राज्यातील पाटणा शहरातून परत आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. परत आल्यापासून हा नागरिक संस्थात्मक अलगीकरणात होता.

वरोरा येथे पाच कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये सोमठाणा पोस्ट टेंभुर्णा येथील 38 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष हे एकाच कुटुंबातील चारजण आहेत. जालना येथे एका विवाह सोहळ्यात हे सर्व सहभागी झाले होते. याच लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या 29 वर्षीय भद्रावती शहरातील चारगाव कॉलनीतील पुरुषही पॉझिटिव्ह आला आहे. तर वरोरा शहरातील पाचवा कोरोनाबाधित 27 वर्षीय युवक असून मध्य प्रदेश मधून परत आला होता. तेव्हापासून गृह अलगीकरणात होता. वरोरा येथील या सर्वाचा स्वॅब 7 जुलै रोजी घेण्यात आला होता. बल्लारपूर शहरातील 7 वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आढळला आहे. या मुलांसह कुटुंबातील 5 सदस्य कारने मुंबईवरून परत आले होते. अन्य चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. मात्र, मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या