120 वर्ष जुन्या ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ चे संवर्धन करुन त्याला ‘कोई फिश पाँड’ ची जोड

सुमारे 120 वर्षे जुन्या असलेल्या ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ चे संवर्धन करुन त्याला जपानी पद्धतीच्या ‘कोई फिश पाँड’ ची जोड देत नवीन रुप देण्याची कामगिरी महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षाने यशस्वीपणे पार पाडली आहे. एकूण चार पुरातन प्याऊ संवर्धित करुन वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात पुनर्स्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱया पर्यटकांसाठी ते एक नवीन आकर्षण ठरु लागले आहे.

प्याऊ म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई या तत्कालीन मुंबई शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक वारशाच्या एक अविभाज्य भाग होत. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, बाजारपेठा, बंदरे, औद्योगिक क्षेत्र, उद्याने, ट्राम अथवा रेल्वे स्थानकांच्या बाहेर नागरिकांना आणि प्राणी, पक्षी यांना देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या पाणपोई उभारल्या जात. प्रसंगी आपल्या नातेवाईकांच्या, प्रियजनांच्या, स्नेहीजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पाणपोई बांधल्या जात. काही प्याऊ या व्यापारी समुदायाच्या सदस्यांनी, सामाजिक दानशुरांनी स्मारक संरक्षित केल्या होत्या. शहरातील सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेच्या आगमनानंतर या पाणपोई हळूहळू वापरातून बाद होवू लागल्या. दक्षिण व मध्य मुंबईत तर आता मोजक्याच प्याऊ अर्थात पाणपोई शिल्लक आहेत. हा पुरातन वारसा शोधून त्याचे संवर्धन करण्याचे पर्यायाने सांस्कृतिक ठेवा जपण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी एक महत्त्वाचा असलेला म्हणजे चार पुरातन प्याऊंचे संवर्धन करुन त्यांना वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात पुनर्स्थापित करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबईतील विविध ठिकाणच्या प्याऊंपैकी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात एकूण चार प्याऊ पुनर्स्थापित करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षाने हाती घेतला होता. या चारही प्याऊंची निर्मिती साधारपणे सन १९०३ ते १९३३ या कालावधीमध्ये झालेली आहे. वारसा स्तर ३ स्थापत्य प्रकारामध्ये या चारही प्याऊंची निर्मिती मोडते. सेठ सामलदास नरसीदास प्याऊ, अर्देशीर दादाभॉय दादीशेट प्याऊ (२), खिमजी मुलजी रंदेरिया प्याऊ अशा या एकूण चार प्याऊ आहेत. या चारही प्याऊ वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानामध्ये मागील अनेक वर्षांपासून सांभाळून ठेवलेल्या होत्या. त्यांचे योग्यप्रकारे जतन करण्याचे काम आता पूर्ण झाले आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पुनर्स्थापित केलेल्या या चार प्याऊंपैकी सर्वाधिक आकर्षणाचा भाग ठरु लागले आहे ते ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’. सेठ सामलदास नरसीदास यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मातोश्री श्रीमती लवेरबाई नरसीदास यांनी सन 1903 मध्ये बांधली होती. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या प्याऊच्या चारही बाजूला सिंहाच्या आकाराच्या मुखातून पाणी वाहण्याची सोय होती. कालांतराने वापरातून बाद झालेली ही प्याऊ मोडकळीस आली होती. त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्याऊचे संवर्धन करताना त्याला एक दगडी कळस व भक्कम दगडी जोतं देण्यात आले, त्यामुळे त्यांचे कारंजामध्ये पुनश्च रुपांतर होवू शकले. योगायोगाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान एक गोलाकार दगडी विहिरीसारखी संरचना असलेली पाणथळ जागादेखील उपलब्ध होती. त्यामुळे या प्याऊला या जागेच्या मधोमध पुनर्स्थापित करुन कारंजा बनवण्याचे ठरले. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानाचा वारसा व त्याचे महत्त्व लक्षात घेता, उद्यानात येणाऱया पर्यटकांच्या आकर्षणासाठी हे कारंजे जपानी पद्धतीचे ‘कोई फिश पाँड’ स्वरुपात तयार करण्याचा निर्णय झाला.

कोई फिश पाँडमध्ये रंगबिरंगी मासे सोडले जातात व हे तळे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. महानगरपालिकेचा पुरातन वारसा संवर्धन कक्ष आणि प्रकल्पासाठी नियुक्त मेसर्स वास्तु विधान यांच्या प्रयत्नाने ‘सेठ सामलदास नरसीदास प्याऊ’ चे आता देखण्या अशा कोई फिश पाँडसह संवर्धन करण्यात आले आहे. विहिरीसारख्या गोलाकार संकल्पनेमध्ये, या प्याऊचे हुबेहूब रूप साकारताना जुन्या प्याऊच्या दगडांवर असलेल्या नक्षीकामाचा संदर्भासाठी उपयोग करण्यात आला. त्यामुळे ही प्याऊ मूळ रूपात संवर्धित करणे शक्य झाले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या पुतळ्याजवळ ही प्याऊ पुनर्स्थापित करण्यात आली आहे. भोवतालच्या कोई फिश पाँडमध्ये कोई या आकर्षक आणि रंगबिरंगी माशांच्या प्रजाती सोडण्यात आल्या आहेत. जपानमध्ये या माशांच्या प्रजातीला समृद्धीचे प्रतीक संबोधले जाते. या माशांचा रंग हा केशरी, पिवळा आणि निळा अशा स्वरूपाचा असतो. साधारणपणे 25 ते 30 वर्षे इतके आयुष्यमान या कोई प्रजातींच्या माशांना असते. या प्याऊच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

अन्य तीन प्याऊंपैकी, कै. अर्देशीर दादाभॉय दादीशेट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन 1912 च्या सुमारास निर्मित दोन प्याऊ आहेत. त्यांचे मूळ ठिकाण मरीन लाइन्समधील दादीशेट आतश बेहराम आणि दादीसेठ वाडी, वाळकेश्वरच्या आसपासचे असावे. या दोन्ही प्याऊंचे बांधकाम मालाड दगड आणि पोरबंदर दगड हे दोन प्रकारचे दगड वापरून करण्यात आले आहे. कमळाच्या आकाराचे पाण्याचे दगडी छोटे कुंड, नक्षीदार कमान असलेले कोनाडे, खांबांच्या प्रतिकृती, पुष्प पट्टीका आणि छज्जा खालील दगडी कंस ही त्यांची प्रमुख वास्तुशिल्प वैशिष्ट्ये आहेत.

उर्वरित चौथा प्याऊ हा खिमजी मुलजी रांदेरिया यांनी 1933 च्या सुमारास त्यांची दिवंगत पत्नी श्रीमती देवीबाई यांच्या स्मरणार्थ बांधला होता. संपूर्ण मालाड दगडामध्ये बांधकाम असलेला हा प्याऊ सुबक, मोजके नक्षीकाम, कमळाच्या आकाराचे पाण्याचे छोटे कुंड आणि एक दान फलक अशा वैशिष्ट्यांचा आहे.

सार्वजनिक ठिकाणी प्याऊ म्हणजे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जायचे. काळाच्या ओघात या पुरातन प्याऊ वापरातून बाद होवून तसेच देखभाल, दुरूस्ती अभावी अडगळीत पडल्या होत्या. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वारसा संवर्धन कक्षामार्फत संपूर्ण मुंबईतील तब्बल ३० प्याऊंचे जतन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यापैकी या चार प्याऊंसह एकूण नऊ प्याऊंचे संवर्धन व पुनर्स्थापन आता पूर्ण झाले आहे. उर्वरित प्याऊंची कामे प्रगतिपथावर आहेत.