#Coronavirus जपानच्या जहाजावर अडकलेले 119 हिंदुस्थानी मायदेशी परतणार

369

जपानच्या बंदरावर उभ्या असलेल्या ‘डायमंड प्रिन्सेस’ या जहाजावर अडकलेल्या 119 हिंदुस्थानींना इंडियन एअरलाईन्सच्या खास विमानाने हिंदुस्थानात जाणार आहे. या जहाजावरील प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर तेथील हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. यात गोव्यातील 50 खलाशी देखील आहेत अशी माहिती अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे. या विमानातून 5 परदेशी नागरिकांना देखील हिंदुस्थानात आणले जाणार आहे.

या जहाजावरील खलाशांपैकी 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यांना दिल्ली विमानतळावर आणल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी हरयाणातील कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी उभारलेल्या विशेष सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. किमान पुढील 20 ते 25 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. नंतरच त्यांना आपल्या राज्यात जाऊ दिले जाणार असल्याची माहिती सावईकर यांनी दिली आहे.

डायमंड प्रिन्सेस या जहाजावर 119 हिंदुस्थानी खलाशी अडकले आहेत. त्यात 50 गोमंतकीय असल्याची माहिती मिळताच अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून काल बुधवारी खास विमानाने हे खलाशी मायदेशी निघाले आहेत.या जहाजावर असलेल्या धनस्थ रायकर या गोमंतकीय खलाशाने विमानात बसल्या नंतरचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. सावईकर यांनी या खलाशांना मायदेशी आणण्यात पूर्ण सहकार्य केल्याने केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर व जपानमधील हिंदुस्थानचे राजदूत संजय कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत.

‘डायमंड प्रिन्सेस’ क्रुझवर असलेल्या प्रवाशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढायला लागला आहे. क्रुझवरील 137 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून त्यात दोन हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना उपचारासाठी योकोहामा बंदराजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधी तेथे तीन हिंदुस्थानींना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या