फ्रान्सला जगज्जेता बनवण्यात १३ देशांचे योगदान

38

सामना ऑनलाईन | पॅरिस

सुमारे २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्रान्सने पुन्हा फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. फ्रान्सच्या या विश्वविजेतेपदात १३ देशांशी संबंधित १७ खेळाडूंचे मोलाचे योगदान आहे.हे खेळाडू सध्या फ्रान्सचे नागरिक आहेत.पण त्यांचे मूळ आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडात आहे. त्यातील काही निर्वासित म्हणून तर काही प्रवासी म्हणून फ्रान्समध्ये आले आणि फ्रान्सचेच नागरिक बनून त्यांनी या देशाला दुसऱ्यांदा फुटबॉलचा जगज्जेता बनवले आहे.

फ्रान्सला फिफा विश्वचषकाचा विजेता बनविणाऱ्या फुटबॉलपटूंत आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंचा भरणा सर्वाधिक आहे. विश्वविजेत्या संघातील फुटबॉलपटूंचा पॅरिस येथे शानदार सन्मान करण्यात आला.आपल्या या राष्ट्रीय हिरोंच्या स्वागतासाठी शहराच्या रस्त्यांवर लाखो पॅरिसकर लोटले होते.

या सतरा स्टार फुटबॉलपटूंनी केले फ्रान्सला विश्वविजेता

एमबापे -विश्वचषकात सर्वोत्तम युवा खेळाडूचा ‘किताब मिळवणारा एमबापेचा जन्म २० डिसेंबर १९९८ ला पॅरिसमध्ये झाला. त्याची आई मा फैझा अल्जिरियाची असून वडील विल्फ्रेड कॅमेरूनचे नागरिक आहेत. एमबापेकडे तीन देशांचे नागरिकत्व आहे.

अँटोनी ग्रीझमेन – अँटोनी जन्माने जर्मन असून त्याचे वडील एलिअन जर्मन असून आई इसाबेल पोर्तुगाली आहे.इसाबेलचे वडील अमारो लोप्स फुटबॉलर होते .ते १९५७ ला फ्रान्समध्ये येऊन स्थायिक झाले होते.

पॉल पोग्बा – पोग्बा वंशाने आफ्रिकन देश गिनीचा आहे,त्याचे आई- वडील गिनीतून येऊन फ्रान्समध्ये वसले आहेत.

ओलिव्हिएर गिरु– स्ट्रायकर ऑलीव्हिएरचे इटालीशी  नाते  आहे.त्याच्या आईचे माता-पिता इटालियन होते

कोरेंटीन टोलीसो – कोरेंटीन आफ्रिकेच्या टोगो देशाचा मूळ नागरिक आहे.त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला आहे.

हयूगो लॉरिस -फ्रेंच कर्णधार आणि गोलरक्षक हयूगो याचे स्पेनशी रक्ताचे नाते आहे .त्याचे वडील स्पॅनिश आहेत.हयूगोच्या आईचे निधन झाल्यावर ते त्याला घेऊन फ्रान्समध्ये स्थायिक झाले.

बेंजामिन मेंडी–मेंडी आफ्रिकन देश सेनेगालमधून येत फ्रान्समध्ये स्थायिक झाला आहे .त्याच्याकडे दोन्ही देशाचे नागरिकत्व आहे . तो हिंदुस्थानातल्या आयएसएलमधेही खेळला आहे.

नबील फेकीर- आक्रमक खेळाडू नबील अल्जेरियन नागरिक आहे.  २०१५ मध्ये त्याने फ्रान्स संघातून खेळण्यास नकार देत अल्जेरिया संघातून खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला.

स्टिव्हन जोंजी – मध्यरक्षक जोंजीचे वडील आफ्रिकन देश कांगोचे नागरिक असून आई फ्रान्सची आहे . जोंजी स्पेनच्या सेविला  क्लबकडून खेळतो.

आदिल रामी – – रामीचा  जन्म फ्रान्समध्ये झाला असला तरी त्याचे आई-वडील मोरोक्कोचे नागरिक आहेत.

सॅम्युएल उमतिति -सॅम्युएलचा जन्म कॅमेरूनमध्ये झाला आहे. तो दोन वर्षांचा असताना त्याचे आई-वडील फ्रान्समध्ये येऊन स्थायिक झाले.

किमपेंबे – किमपेंबेचे वडील कांगोचे तर आई हैतीची नागरिक आहे. १७ ऑक्टोबर २०१४ला किमपेंबेने आपल्या व्यावसायिक फुटबॉल खेळास प्रारंभ केला.

स्टीव मंडांडा– फ्रान्सचा दुसरा गोलकीपर स्टिव्हचा जन्म २८ मार्च १९८५ ला कांगोच्या किशान्सा शहरात झाला होता .

नगोलो कांटे-नगोलोचा परिवार आफ्रिकेच्या माली देशातून येत फ्रान्समध्ये स्थायिक झाला आहे .२०१५ मध्ये त्याला आफ्रिकन नेशन्स कपमधून मुलींसाठी खेळण्याचे आमंत्रणही आले होते.

उस्मान डेंबले -उस्मानची आई सेनेगलची असून वडील मालीचे नागरिक आहेत. उस्मानचा जन्म फ्रान्समध्ये झाल्याने त्याला तीन देशांचे नागरिकत्व मिळाले आहे.

ब्लेज मतोदी – मध्यरक्षक ब्लेजची आई कांगोची नागरिक असून वडील फरियो अंगोलाचे नागरिक आहेत.

सिदिबे -बचावपटू सिदिबेचा जन्म फ्रान्समध्ये झाला असला तरी त्याचे आई-वडील मूळचे माली देशाचे नागरिक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या