येमेनमध्ये बोट बुडाली, 13 जणांचा मृत्यू; 14 जण बेपत्ता

जिबूतीहून 27 प्रवाशांना घेऊन निघालेली बोट येमेनच्या किनारपट्टीवर बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या दुर्घटेनतील बोटीतील 13 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला तर 14 जण बेपत्ता आहेत. येमेनमधील बानी अल-हकम उपजिल्हामधील दुबाब जिल्ह्याजवळ ही दुर्घटना घडली.

युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सीचा हवाला देत अल जझीराने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त बोट जिबूतीहून 25 इथिओपियन आणि दोन येमेनी नागरिकांना घेऊन रवाना झाली. मात्र इच्छित स्थळी पोहचण्याआधीच येमेनच्या किनाऱ्यावर बोटीला जलसमाधी मिळाली.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने एका निवेदनाद्वारे बोट दुर्घटनेची पुष्टी केली. बोट दुर्घटनेचे कारण अद्याप कळू शकले नाही. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये 11 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्या 14 जणांचा शोध सुरू आहे.