धक्कादायक! सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीने स्वत:ला पेटवले

1227
प्रातिनिधिक फोटो

आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशमधील बैतुल येथे घडली होती. या घटनेतील बलात्कार पीडितेने स्वत:ला पेटवून दिले आहे. यात ती मुलगी 95 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

पीडित मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिले असून त्यात तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांची माहिती दिली आहे. मंळवारी ही मुलगी तिच्या नातेवाईकांकडे बैतूल येथे गेली होती. तेथे तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. या बलात्कारामुळे त्या मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिने घरी येऊन याबाबत पालकांना सांगितले. तिचे आई वडील या प्रकरणी तक्रार दाखल करायला पोलीस ठाण्यात गेले असता घरी एकटी असलेल्या मुलीने स्वत:वर केरोसिन ओतून स्वत:ला पेटवून दिले.

देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात बलात्काराविरोधात कठोर कायदे करण्याची मागणी केली गेली. मात्र तरिही अद्याप देशातील महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांमध्ये कमी झालेली नाही. निर्भया या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली असतानाही अद्याप त्यांना फासावर लटकवलेले नाही. बलात्काऱ्यांनी सतत कायद्यातील पळवाटा शोधून काढत त्यांची फाशी पुढे ढकलली मात्र आता अखेर 1 मार्चला त्यांना फासावर लटकविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात दिशा कायदा 

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद बसावा या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा आणण्यात येणार आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजना करण्याबाबत मंगळवारी विधान भवनात बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आंध्र प्रदेशला भेट देऊन ‘दिशा’ कायद्याविषयी तेथील मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच इतर मंत्री आणि पोलीस प्रमुखांशी चर्चा करून माहिती घेतली. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन या कायद्याच्या धर्तीवर कायदा राज्यात करण्यासाठी विचारात घ्यायचे मुद्दे आदी अनुषंगाने अभ्यास करून कायद्याचा मसुदा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. ही समिती निर्धारित कालावधीत मसुदा सादर करेल. त्यानुसार विधान मंडळाच्या सभागृहामध्ये लवकरच मंजुरीसाठी हा कायदा आणला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या