बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार

बलूच नेते मीर यार बलूच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्यापासून बलूच लिबरेशन आर्मीला बळ मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि बलूच लिबरेशन आर्मीतील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यातच बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे समोर आले आहे. बलूच आर्मीने याबाबतचा व्हिडीओही जारी केला आहे. तर पाकिस्तान सरकारच्या विजय दिवस समारोहातही ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यात पाकिस्तानी एजंटचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

बलूच लिबरेशन आर्मीने आज एक व्हिडीओ जारी केला. अंदाधुंद गोळीबार करत बलूच आर्मीने 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षणात क्वेटा येथे विजय दिवस सोहळ्याचे आयोजन केले होते. हा सोहळा सुरू होण्यापूर्वी बलूच आर्मीने मुनीर मेंगल रोड येथे ग्रेनेड फेकले.

सोशल मीडियावर बलुचिस्तान रिपब्लिक ट्रेंड

सोशल मीडियावर बलुचिस्तान रिपब्लिक ट्रेंड सुरू झाला आहे. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य सैनिकांकडून बलुचिस्तानसाठी स्वतंत्र राष्ट्रीय ध्वज आणि बलुचिस्तानचा स्वतंत्र नकाशाही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या खासदार मरियाम सोलायमानखिल यांनीही पाकिस्तानी सैन्याकडून बलूच नागरिकांचे होणारे अपहरण, अत्याचार यावरून जोरदार टीका केली आहे.