पेगॅससप्रकरणी विरोधी पक्षांच्या 14 नेत्यांची बैठक

पेगॅसस, हेरगिरीप्रकरणी मोदी सरकारविरुद्ध विरोधी पक्ष आणखी आक्रमक झाले आहेत. बुधवारी दिल्लीत 14 प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे यासह इतर मुद्दय़ांवर संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्रितपणे सरकारला चांगलेच घेरण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रमुख राजद, सपा, माकप, भाकप, आप, नॅशनल कॉन्फरन्ससह 14 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत पेगॅससप्रकरणी सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारला जाब विचारण्यात येईल. जोपर्यंत सरकार या मुद्दय़ावर चर्चा करत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

हेरगिरी हा तर राष्ट्रद्रोराहुल गांधी

पेगॅससच्या माध्यमातून नेत्यांवर, सर्वोच्च न्यायालयावर, पत्रकारांवर पाळत ठेवली गेली. हेरगिरी केली गेली. पेगॅससचा वापर देशविरोधी शक्तीविरोधात करण्याऐवजी आमच्याविरोधात केला गेला. पेगॅसस हेरगिरी हा राष्ट्रद्रोह आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.  संसदेचे कामकाज खंडित करण्याचा आमचा उद्देश नाही. पेगॅसस प्रकरणावर सरकारने चर्चा करावी. आमच्या फक्त एका प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावे. पेगॅसस सरकारनेच आणले का? आणि त्याचा वापर आपल्याच देशातील लोकांची हेरगिरी करण्यासाठी केला का? असे राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षा, शेतकऱयांच्या मुद्दय़ावर विरोधक एकत्र संजय राऊत

राष्ट्रीय सुरक्षा आणि कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावर आम्ही सर्व विरोधक एक आहोत असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पेगॅससच्या माध्यमातून सरकारने राजकीय विरोधकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पेगॅससवर संसदेत चर्चा करण्याची हिंमत सरकारने दाखवावी, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या